गाडगे महाराजांच्या खराट्याने डोक्यातले वाईट विचार साफ करा : लक्ष्मीकांत खाबिया

उरुळी कांचन

विदर्भात संत गाडगेबाबा हे मोठे संत होऊन गेले. गाडगेबाबा दिवसा आपल्या खराट्याने गाव स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी आपल्या कीर्तनरूपी खराट्याने माणसाच्या डोक्यातील वाईट विचार काढण्याचे काम करायचे, जीवन कशा पद्धतीने जगावे याचे मार्गदर्शन करायचे. बंदीजन हो येथून जाताना संत गाडगेबाबा यांचा विचाररूपी खराटा सोबत न्या, त्याने आपल्या डोक्यातील वाईट विचार साफ करा, भजन स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या विचारांशी शक्ती सोबत न्या, असे आवाहन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अकोला कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत ‘अबीर गुलाल’, ‘तुझ्या माझ्या देवा’, ‘नको देव राया अंत आता पाहू’, आणि स्वरचित ‘कथा जीवनाची मी सांगायला आलो’ या रचना सादर केल्या. त्या वेळी खाबिया यांनी बंदीजनांशी संवाद साधला.

कारागृह अधीक्षक सुभाष निर्मळ, वरीष्ठ तुरंग अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, तरुंग अधिकारी महेश जोशी, डॉ. रवींद्र आर्य, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजय मिसाळ, शंकर धुमाळ, संगीत शिक्षक पद्माकर मोरे, प्रतिष्ठानचे अकोला जिल्हा अध्यक्ष शिवराज गावंडे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष हरिदास आखरे, नलिनी गावंडे, विश्वास मोरे, आरजे गौरव, माधव भगत आदी उपस्थित होते. श्याम राऊत यांनी आभार मानले.

ही आध्यात्माची दाकद

गेल्या एक महिन्यापासून भजन आणि अभंगाच्या सरावामुळे बंदीजनांच्या वागण्यात, बोलण्यात फरक जाणवत आहे. हीच आध्यात्मामध्ये ताकद आहे.
सुभाष निर्मळ, अधीक्षक, अकोला कारागृह

बंदीजन म्हणतात..

शिवा विलेकर हा बंदी म्हणाला, भजन स्पर्धेमुळे जीवनप्रवासाचा खऱ्या अर्थाने उलगडा झाला. रंजीत गावंडे म्हणाला, स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे नकारात्मकता दूर होऊन बंदीजनांच्या विचारांमध्ये नक्कीच सकारात्मकता येईल. नवनाथ आहेर म्हणाला, कारागृह ही जागा बदला घेण्याची नाही तर विचारात बदल करून जाण्याची, चांगला विचार घेऊन जाण्याची जागा आहे, हे भजन स्पर्धेमुळे समजले. निलेश डोंगरे म्हणाला, संत जर या जगात नसते तर समाजाध्ये सकारात्मक विचारांची जागृती झाली नसती. आज पंढरीच्या वारीत सहभागी झाल्याचे समाधान आम्हा सर्वांना आहे.

विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र

महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.

Previous articleप्रा. कैलाश महानोर यांना समाजभूषण पुरस्कार
Next articleसंत निरंकारी मिशन तर्फे चिंचोली (कोकणे) येथे २६ जून रोजी ‘भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन