देवदर्शन यात्रा समितीवतीने वसंतस्मृती सेवा सप्ताहाचे आयेजन

उरुळी कांचन

येथील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन आपल्या “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने गेली कित्येक वर्षे नियमित “श्री क्षेत्र पंढरपूर दर्शन यात्रा” आयोजित करीत आहेत. समितीच्या वतीने भक्तिमय वसा जपत दरवर्षी विविध समजोपायोगी उपक्रम राबविले जातात. याही वर्षी सदस्यांच्या संकल्पनेतून समितीचे मार्गदर्शक “स्व. वसंतराव मारुती दुधे” यांच्या स्मरणार्थ “श्री वसंतस्मृती सेवा सप्ताह” चे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाची सुरुवात असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणीस मनोभावे महावस्त्र पूजनसेवा अर्पून करण्यात आली. समितीने परिचयातील काही अपंग व्यक्तींना विनामूल्य श्री दर्शन घडवून त्यांच्याही सेवेसी तत्पर राहण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्या बद्दल तत्सम व्यक्तींनी समितीचे साश्रू नयनांनी आभार मानले.

या यात्रेदरम्यान समितीने पंढरपूर येथे पालवी संगोपन प्रकल्प या एचआयव्ही ग्रस्त निराधारांसाठी झटत असलेल्या संस्थेतील मुला मुलींना “श्री वसंतस्मृती पालवी निराधार संगोपन सेवा” अर्पण केली. संस्थेच्या मागणी नुसार त्यांस दैनंदिन जीवनातील आवश्यक अशा कित्येक गोष्टींची पूर्तता यातून करण्यात आली. तसेच तेथील मुलांना शैक्षणिक सहाय्य संचाचे वाटप करण्यात आले.

विशेष बाब म्हणजे तेथील मुलांनी आपल्या हाती मिळालेल्या सर्व भेटवस्तू स्वतःकडे न ठेवता प्रकल्पाच्या संचालकांकडे स्वतःहून एकत्रित जमा करून संस्थेतून होणाऱ्या नियमित संस्कारांचे दर्शन घडविले. समितीच्या सदस्यांना याबद्दल विशेष कौतुक वाटले.

आपल्या भारतीय संस्कृतीतील सेवासंस्कृतीचा मान ठेवत “श्रीमती मंगलताई शहा” या गेली कित्येक वर्षे आपल्या पालवी संगोपन प्रकल्पाच्या माध्यमातून निराधार गरजवंतांची सेवा सुश्रुषा करीत आहेत. या अनन्यसाधारण कर्तृत्वातून त्यांनी स्त्रीशक्तीचे एक सर्वोत्तम उदाहरण समाजापुढे ठेऊ केले आहे. याच अनमोल सेवेचे कौतुक करण्याच्या हेतूने मंगलताईंना “श्री वसंतस्मृती सेवागौरव पुरस्कार” प्रदान करून समितीचे सर्व सदस्य कृतज्ञ झाले.

समितीच्याही कार्याची इत्तंभूत माहिती घेऊन दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित नावलौकिक वाढविणार्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे मंगलताईंनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद दिले.येणाऱ्या काळात असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे समितीच्या प्रमुख सदस्यांनी नमूद केले.

Previous article‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात खाद्यभ्रमंती उत्साहात संपन्न
Next articleनारायणगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा