शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित भजन स्पर्धेत नांदेड कारागृहातील बंदीजनांचा सहभाग

उरुळी कांचन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगत्‌गुरू तुकोबाराय यांच्या साक्षीने स्वराज्याची निर्मिती केली त्याच प्रमाणे पंढरीचा पांडुरंग आणि तुकोबारायांचे नाव घेत चांगल्या विचारांचे सुराज्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षा शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केली.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत ‘सरली प्रित सरले नाते’, ‘नशिबात माझ्या काही लिहिले रे’, ‘ऐकूनी वेणुचा नाद’ आणि ‘कुठे शोधू तुला चक्रपाणी’ या रचना सादर केल्या. त्या वेळी खाबिया यांनी बंदीजनांशी संवाद साधला.

कारागृह अधीक्षक रवींद्र रावे, तुरंग अधिकारी धीरजकुमार रुतवे, तसेच शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संगीत शिक्षक रवींद्र ढगे, संदीप राठोड, गोविंद हुंडेकर, डॉ. संदीप करंजकर आदी उपस्थित होते.

बंदीजनांच्या विचारात सकारात्मक परिणाम होईल

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने बंदीजनांसाठी आयोजित केलेल्या भजन आणि अभंग गायन स्पर्धेमुळे बंदीजनांच्या विचारांवरती नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, असा मला विश्वास आहे.
रवींद्र रावे, अधीक्षक, नांदेड कारागृह

गुन्हेगारीपासून दूर राहण्याची शपथ
‘नशिबात माझ्या काय लिहिले देवा असे काय पाप केले म्हणून मी येथे आलो’ असे काव्य सादर करून या पुढे निश्चितच सद्विचार आणि सद्मार्गावर चालण्याची ग्वाही देतो असे प्रभाकर सोनटक्के हा बंदी म्हणाला. तर विलास शिंदे हा बंदी म्हणाला, भजन स्पर्धेमुळे कारागृहामध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात जे वाईट विचार घोळत होते ते विठुनामाच्या गजराने दूर झाले आहेत. अनवधानाने माझ्या हातून काही गुन्हे झाले पण आता विठ्ठल नामाच्या साक्षीने गुन्हे करणार नाही, अशी शपथ संजय राठोड याने घेतली.

विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र

महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.

Previous articleचाकण येथे १०० खाटांचे कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारण्यास मंजुरी ;खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleविलू पूनावाला फाऊंडेशनच्या मार्फत सोरतापवाडीत बसवला जागतिक दर्जाचा शुद्ध पाणी पुरवठा प्लांट