जुन्नर आंबेगावच्या सीमेवर बिबट्याच्या मादीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

नारायणगाव : (किरण वाजगे )

जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या सीमेनजीक कळंब हद्दीमध्ये अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने बिबट्याच्या मादीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार दिनांक ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कळंब गावच्या हद्दीत हॉटेल आपुलकी जवळ घडली.

दरम्यान स्थानिक नागरिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर जुन्नर व मंचर वनक्षेत्र हद्दीमधील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहिले.

हा अपघात घडल्यानंतर काही वेळातच वनपाल एम जे काळे,एन एम आरुडे,वनरक्षक रामेश्वर फुलवाड,के के दाभाडे, ऋषिकेश कोकणे, वन कर्मचारी खंडू भुजबळ, डोके, भालेराव यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला ताब्यात घेतले.

याप्रसंगी बिबट रेस्क्यू टीम चे सदस्य किरण वाजगे तसेच सामाजिक कार्यकर्ते पवन गोसावी महेश बांदल यांनी देखील मृत बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू कार मध्ये ठेवण्यास मदत केली.

मृत बिबट्या मादीचे शवविच्छेदन करण्यात आले असून तिचा अंत्यविधी मंचर वनक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील अवसरी घाटात करण्यात आला अशी माहिती वनक्षेत्रपाल स्मिता राजहंस यांनी दिली.

दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर कळंब ते नारायणगाव हद्दीपर्यंत असलेल्या पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये गेल्या दोन वर्षात सुमारे पाच ते सहा बिबट्यांना आपला अपघातांमध्ये जीव गमवावा लागला असून रान मांजर, कोल्हा, तरस आदी वन्यप्राण्यांना या महामार्गावर आपला जीव गमवावा लागला आहे.

Previous articleनारायणगावात ३ हजार ५०० किलो गोमांस जप्त
Next articleटिळेकरवाडी येथे खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांना कृषी अधिकांऱ्यानी केले मार्गदर्शन