नारायणगावात ३ हजार ५०० किलो गोमांस जप्त

किरण वाजगे

नारायणगाव येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते, गोरक्षक व नारायणगाव पोलिसांनी संयुक्तरित्या सापळा रचून व बेकायदा गोमांस वाहतूक करणाऱ्या चालक व क्लीनर ला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील सहा लाख रुपये किमतीचे गोमांस व टाटा टेम्पो ४०७ हस्तगत केला आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. ७ जून २०२२ रोजी रात्री पुणे नाशिक रोड ने आळेफाटा नारायणगाव मार्गे ४०७ टेम्पो क्र. एम एच ४३ ए डी ९२४३ मध्ये गोमांस भरून मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली. शिवशंकर स्वामींनी त्यांच्या विश्वासू सहकार्‍यांना या गाडीची माहिती कळवून नारायणगाव पोलिसांची मदत घेऊन हा टेम्पो ताब्यात घेण्यास सांगितला. रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो पुणे नाशिक हायवेने येताना गोरक्षकांना दिसला. सदर टेम्पो पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव अझरुद्दीन जमालुद्दिन शेख (वय २९) व क्लिनर अब्दुल नसिम खान (वय ३६, दोघे रा. सारा रहिवासी सेवासदन, कुरेशी नगर, कुर्ला ईस्ट कल्याण, जिल्हा ठाणे ) असे सांगून मालेगाव येथे गायी व बैल कापून त्याचे मांस मुंबई गोवंडी येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता गायी व बैलाचे मुंडके, कातडी सोललेल्या अवस्थेत धड व पाय दिसून आले. पोलिसांनी गाडी चालक, गायी बैल कापणारे, गोमांस विकत घेणारे व टेम्पो मालक यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत १९७६ चे कलम ५ (क) ९ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला व सर्व गोमांस डिस्पोज केले असल्याचे समजते.नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा माने यांनी यासंदर्भात नारायणगाव पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या कारवाईत शिवराज संगनाळे , कृष्णा माने , ऋषी जंगम , सुदर्शन वाजगे , कौस्तुभ सोमवंशी , संकर्षण वाव्हळ , ओंकार नायकोडी आदी गोरक्षकांनी सहभाग घेतला.
नारायणगाव पोलिसांनी व गोरक्षकांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Previous articleचार हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले
Next articleजुन्नर आंबेगावच्या सीमेवर बिबट्याच्या मादीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू