नारायणगाव ,किरण वाजगे
गणेश जयंती दिनी अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहराचे दर्शन आज शुक्रवार दि. ४ रोजी पहाटे ०५ वाजता सुरु करण्यात आले. या निमित्ताने हजारो गणेश भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले याप्रसंगी ओझर येथील मुख्य प्रवेशद्वार ते भक्त भवन क्रमांक एक या रस्त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, ,सचिव दशरथ मांडे, विश्वस्त राजश्रीताई कवडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला व मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे गणेश जयंती निम्मित्ताने ” श्रीं ” ची महाआरती सकाळी ठीक ७.३० वा. अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाली .
या महाआरतीसाठी ओझर गावातील दानशूर व्यक्तीमत्व श्रीमती आशाताई मधुकर मांडे, ह.भ.प.विशालमहाराज कलाटे, शंकरभाऊ जगताप , विजय डुबे , स्वप्नील काळे यांना आरतीचा मान देण्यात आला. आरतीचे मानकरी ह.भ.प. विशाल महाराज कलाटे यांनी श्री विघ्नहर्त्यास चांदीचे ४ लक्ष ५१ हजार रूपये किमतीचा मूषक दान म्हणून दिला. आशाताई मधुकर मांडे यांनी २ लक्ष ५१ हजार रूपये देवस्थान ट्रस्टच्या विकासकामांसाठी देणगी दिली. महाराष्ट्रातील अनेक भागांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.०० वा. मंदिरातून पालखीचे आंबेराई येथे प्रस्थान झाले. ह.भ.प गणेश महाराज वाघमारे यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले. बरोबर १२.३० वाजता गणेश जन्माच्या अभंगाचे गायन करून संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची उधळण करून श्री गणेश जन्म साजरा करण्यात आला. ’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली.