शोकाकुल वातावरणात जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नारायणगाव,किरण वाजगे

शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथील शशिकांत पोपट शिंदे (वय-३८) या जवानाचा मृत्यू झाल्याने जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.जम्मू काश्मीर मध्ये भारतीय आर्मी सेवेत असणारे वीर जवान शशिकांत शिंदे बदली झाल्याने सुट्टीवर गावी परतत असताना भोपाळ येथे रेल्वेमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती गावचे माजी सरपंच रोहिदास शिंदे यांनी दिली. त्यांच्यावर शिंदेवाडी येथे मंगळवार (दि.१८) रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


याप्रसंगी जुन्नर तहसीलदार,सर्व प्रशासकीय अधिकारी,जुन्नर तालुका माजी सैनिक संघटना,आळेफाटा पोलीस उपस्थित होते.

पोलिसांनी या वीर जवानाला मानवंदना दिली. त्यांनी २० वर्ष देश सेवा केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रगती, मुलगा वेदांत (वय-१२ वर्ष) व दुसरा मुलगा प्रतीक तसेच आई-वडील, भाऊ असा त्यांचा परिवार आहे.


शेतकरी व गरीब कुटुंबतील या जवानाच्या मृत्यूने शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. अंत्यविधी वेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. या कुटुंबाला धीर देण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या वीर जवानावर गावात शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करते वेळी ‘अमर रहे,अमर रहे, वीर जवान अमर रहे’ भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला.या जवानाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या वीर जवानाच्या मृत्यूमुळे गाव शोकसागरात बुडाले आहे.

Previous articleनाशिकच्या “दुर्ग पंढरी” अभ्यास मोहीम फत्ते
Next articleअज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू