अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू

नारायणगाव ,किरण वाजगे

खामुंडी (ता. जुन्नर) येथील कल्याण नगर महामार्गावर पाण्याच्या टाकी जवळ बोडके मळा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तरस प्राण्याचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

घटनेची माहिती समजताच उपवनसंरक्षक जयरामे गौडा व ओतूर वनविभागाचे अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एम. गिते, वनरक्षक अतुल वाघोले, वनसेवक किसन केदार व साहेबराव पारधी यांनी घटना स्थळी जाऊन मृत तरस ताब्यात घेतले. रात्री भक्षाच्या शोधात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच ओतूर पोलीस स्टेशनचे हवालदार मुकुंद मोरे व कमर्चारी हे देखील वनविभागाच्या मदतीसाठी उपस्थित होते. हा तरस सुमारे ४ वर्षाचा नर असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात डॉ. निखिल बनगर यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती वनरक्षक अतुल वाघोले यांनी दिली.

Previous articleशोकाकुल वातावरणात जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Next articleरोटरी क्लब हायवे तर्फे शिक्षकांचा बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन गुणगौरव