पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात माजी विद्यार्थीचा स्नेह मेळावा संपन्न

अमोल भोसले

उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी स्नेह मेळावा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव सोपान कांचन व विश्वस्त महादेव कांचन होते. कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या सामाजिक, शैक्षणीक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश गायकवाड, प्रा. प्रतिभा शिरसाट यांनी मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ यांच्या सुखाचे मानसशास्त्र या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव सोपान कांचन व विश्वस्त महादेव कांचन या मान्यवरांच्या हस्ते झाले.

महादेव कांचन यांनी सुखाचे स्वरुप सांगताना विद्यार्थ्यांनी जीवनात योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव सोपान कांचन यांनी महाविद्यालयाच्या विकासातील माजी विद्यार्थी संघाची महत्त्वपूर्ण भूमिका असून माजी विद्यार्थी संघाच्या विविध सूचना अंमलात आणून महाविद्यालयात नवनवीन उपक्रम सुरु करण्याची भूमिका मांडली.

IQAC समन्वयक प्रा. मेटे एन.आर. यांनी माजी विद्यार्थी संघाची NAAC मूल्यमापनातील भूमिका याविषयी मार्गदर्शन करताना महाविद्यालयात सुरू असणाऱ्या NAAC प्रक्रियेची माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी जे विभाग कार्यरत आहेत त्यांची माहिती दिली. महाविद्यालयाच्या विकासातील माजी विद्यार्थी संघाची महत्वपूर्ण भूमिका असून त्यांच्या सहकार्याने महाविद्यालयात नवनवीन उपक्रम सुरु करण्याची भूमिका मांडली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कानकाटे व्ही. एन यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. आबनावे एस. व्ही. यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. गायकवाड एस. जे. यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनात सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या मेळाव्यात एकूण ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत पार
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नागरिक सेलच्या राज्यप्रमुखपदी सोनबा चौधरी यांची निवड