अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ग्राहक जनजागृती कार्य कौतुकास्पद – अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे

गणेश सातव,वाघोली

जागृत ग्राहक हा समाज मनाचा आरसा असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक नागरिक हा ग्राहक बनून कार्यरत असतो. प्रत्येकाला ग्राहक म्हणून आपले अधिकार व जबाबदारी माहिती असणे गरजेचे असते. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवहारात लक्ष घालून आपल्याला योग्य सेवा मिळतात का ? एखाद्या वस्तू खरेदीत फसवणूक होते का ? याबाबत जागरूकता दाखवणे हे आपले कर्तव्य आहे असे मत हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, हवेली तालुका व हवेली तहसील कार्यालय पुरवठा विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक ग्राहक मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथील पृथ्वीराजकपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या या मेळाव्यात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विजयकुमार चोबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव व विद्यालयाचे प्राचार्य एस एम गवळी होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र बाप्पू काळभोर, जिल्हा कोषाध्यक्ष राघवदास चौधरी, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक  सुनील जगताप, पुणे जिल्हा सोशल मिडिया परिषदेचे अध्यक्ष जनार्दन दांडगे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप शिवरकर, उपाध्यक्ष विठ्ठल ठोंबरे, संघटक गणेश सातव, सचिव कैलास भोरडे, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख सचिन सुंबे,जेष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर,सचिन माथेफोड, विजय काळभोर, चंद्रकांत दुंडे, संदीप बोडके, नितीन करडे आदी उपस्थित होते.

 

  यावेळी बोलताना विजयकुमार चोबे पुढे म्हणाले ग्राहक या नात्याने तुम्हाला अनेक अधिकार दिलेले आहेत आणि या अधिकारांची माहिती घेऊन तुम्ही जागरुक ग्राहक बनू शकता. शिवाय या अधिकारांची माहिती असल्यामुळे तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता. सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. तुमची फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार कुठे करावी, याची माहिती तुम्हाला या जाहिरातींमधून मिळते. कुणाकडून तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही संबंधित विक्रेत्याला धडा शिकवू शकता आणि तुमची नुकसान भरपाईही मिळवू शकता.

  यावेळी बोलताना राज्य ग्राहकसंरक्षण परिषदेचे सदस्य अँड.तुषार झेंडे म्हणाले दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार वस्तू व सेवा यातील त्रुटीसाठी ग्राहकाला तक्रार दाखल करता येते. ग्राहकाला वयाचे बंधन नसते. कोणताही व्यक्ती, ग्राहक या कायद्याचा अवलंब करु शकतो. बिंदूमाधव जोशी व सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या ग्राहक चळवळीला १९७४ साली संघटनेचे स्वरूप देण्यात आले. १९८६ साली पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायद्याला मान्यता दिली. ३० जुलै २०२० रोजी संपूर्ण देशात कायदा लागू झाला. कायद्यात १०७ कलमे आहेत. प्रत्येक व्यक्तीला गृहीत धरुन कायद्याचे पालन करावे लागते. ग्राहकांना तक्रार दाखल करुन न्याय मागण्यासाठी शासनाने जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक संरक्षण आयोग, राज्यपातळीवर राज्य ग्राहक संरक्षण आयोग व देशपातळीवर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाची स्थापना कायद्यानुसार केली आहे.

  यावेळी प्राचार्य एस एम गवळी, राजेंद्र बाप्पू काळभोर यांनी ही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राघवदास चौधरी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अर्जुन कचरे यांनी केले. उपस्थितांचे आभार हवेली तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संदीप शिवरकर यांनी मानले.

Previous articleएखाद्या वस्तू खरेदीत फसवणूक होते का ? याबाबत जागरूकता दाखवणे हे आपले कर्तव्य- तहसीलदार विजयकुमार चोबे
Next article“समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल्ड” या संस्थेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी रोजगार मेळावा संपन्न