चाकण एमआयडीसीत ईएमआय रूग्णालय उभारण्याची खासदार डॉ अमोल कोल्हे यांची मागणी

अमोल भोसले, पुणे

चाकण व रांजणगाव एमआयडीसीत लाखो कामगार काम करीत आहेत, त्यांना वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी चाकण येथे सर्व सोयींनी सुसज्ज असे कर्मचारी विमा योजनेचे रुग्णालय (ESI) उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय श्रममंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली. या मागणीवर श्री. यादव यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात चाकण, रांजणगाव या मोठ्या एमआयडीसी असून अनेक भारतीय व बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्याचप्रमाणे या कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे असंख्य छोटे-मोठे उद्योग आहेत. या सर्व कंपन्या व कारखान्यात लाखो कर्मचारी काम करतात. या कामगारांच्या वेतनातून ईएसआयची दरमहा नियमित रक्कम कापली जाते. मात्र या कामगारांना कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळत नाही. अत्यावश्यक असल्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे या परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी विमा योजनेच्या रुग्णालयाची मागणी चाकण व रांजणगाव एमआयडीसी असोसिएशन व कामगार संघटनांनी केली होती.

या मागणीची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याच्या कामगार मंत्रालयाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्यानंतर चाकण येथे कर्मचारी विमा योजनेचे रुग्णालय उभारण्याच्या प्रस्ताव केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय श्रममंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली. यावेळी श्री. यादव यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Previous articleविलोभनीय दृश्य
Next articleनारायणगाव महाविद्यालयात बँकिंग करिअर मार्गदर्शन कार्यशाळा