स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी आत्मदहनाच्या इशाराऱ्याची शासनाने घेतली दखल

नारायणगाव ,किरण वाजगे

राज्यात तमाशा व त्या स्वरूपाच्या लोककला सादर करण्यासाठी आता पोलिसांचा अडथळा येणार नसल्याचे आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला अशी माहिती मराठी तमाशा लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजी राजे जाधव यांनी दिली.

मराठी लोकनाट्य तमाशा कला तसेच दशावतारी, भारुड, शाहिरी या लोककला सादर करणाऱ्या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी ग्रामीण भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पोलीस परवानगी देत नव्हते.
या घटनेच्या निषेधार्थ मराठी तमाशा लोककलावंत परिषदेच्या वतीने बुधवार (दि.१५) रोजी कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत आज मुंबई मंत्रालयात गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीत लोककला तमाशा, भारुड, दशावतार तसेच शाहिरी या स्वरूपाचे कार्यक्रम मोकळ्या मैदानात तसेच बंदिस्त सभागृहात घेण्यासाठी मागील ऑक्‍टोबर महिन्यातच परवानगी देण्यात आली होती. मात्र पोलीस या कलाकारांना कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर आपली कला सादर करण्यास परवानगी देत नसल्याच्या घटना घडल्यामुळे मराठी तमाशा लोक कला परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव व इतर तमासगीरांच्या वतीने कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता.आज मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे संभाजी राजे जाधव यांनी सांगितले आहे.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासह जलसंपदामंत्री जयंत पाटील, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. गणेश चंदनशिवे, खंडुराज गायकवाड, तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी राजे जाधव राज्य पोलीस दलाचे उपमहासंचालक सुहास वारके आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleपवनानगर येथे दि एम्पायर रेस्टॉरंट चे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते
Next articleवडकी येथे कृषिभवन ‌कार्यालयाचा भुमिपुजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते संपन्न