अन्यथा राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करू – खा. डॉ अमोल कोल्हे

किरण वाजगे,नारायणगाव

पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक उपाययोजना तातडीने करा. असे सांगून बाह्यवळण रस्त्याच्या कामातील त्रुटीमुळे अपघात झाल्यास राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी लागेल असा इशारा शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत दिला.

नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याच्या खोडद चौकात नुकत्याच झालेल्या कल्पना योगेश भोर (वय ३२) या महिलेच्या अपघाती मृत्यूमुळे खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थांनी आंदोलन करून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. खासदार डॉक्टर कोल्हे यांनी ३० नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खोडद चौकातील भुयारी मार्गाच्या मंजुरीसाठी तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले होते.

दरम्यान खासदार डॉ. कोल्हे यांनी स्वर्गीय कल्पना योगेश भोर यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त बाह्यवळण रस्त्याची पाहणी करून अपघात टाळण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येतील याबाबत हिवरे, खोडद ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली.

या बैठकीला युवा नेते अमित बेनके, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी अमित गोरड, सीडी फकीर, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार रवींद्र सबनीस, दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, गुलाब नेहरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, इंद्रभान गायकवाड, अशिष वाजगे, अवधूत खरमाळे, गणेश वाजगे, विकास दरेकर, तुषार डोके, प्रबोध सावंत, राजेश कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी ग्रामस्थ इंद्रभान गायकवाड, अवधूत खरमाळे, यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, खोडद चौकात १५ मीटर रुंद, व साडे पाच मीटर उंच भुयारी मार्ग करण्यात येईल. मात्र यासाठी तांत्रिक बाबी व कामाची मंजुरी यासाठी वेळ लागेल.
दरम्यान येथे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी व खोडतद कडून येणाऱ्या वाहनांना थांबण्यासाठी योग्य जागा निर्माण करणे, दोन गतिरोधकांच्या मधल्या भागात योग्य जाडीचे गतिरोधक व रबलर बसवणे, अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा येत्या आठ दिवसात तातडीने करणे अशाप्रकारच्या सूचना खासदार कोल्हे यांनी केल्या. या कामात हलगर्जीपणा केला व अपघात झाला तर प्रशासकीय कारवाई करावी लागेल असा इशारा देखील खासदार कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये अवधूत खरमाळे, आशिष वाजगे, सुरज वाजगे, अमित बेनके, प्रशांत वाजगे यांनी भाग घेतला.

दरम्यान खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ११ दिवसांपूर्वी कांदळी येथील अनंत पतसंस्थेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या स्वर्गीय राजेंद्र दशरथ भोर या पतसंस्था व्यवस्थापकांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांनी भोर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Previous articleकस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सर्विसरोडचे पाणी उपसून रस्ता केला मोकळा
Next articleमावळच्या सुपुत्रांचे नेमबाजी स्पर्धेत यश