चाकण चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन विविध उपाययोजना करण्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाहतूक पोलीस प्रशासनास दिले निर्देश

अमोल भोसले, उरुळी कांचन

आगामी दिवाळीच्या काळात होणारी चाकण चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन किमान १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ यावेळेत कन्टेनर आदी जड वाहनांच्या वाहतूक बंद ठेवण्यासह विविध उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाहतूक पोलीस प्रशासनास दिले.

चाकण चौकातील वाहतूक कोंडी हा गेल्या काही वर्षांपासून अतिशय कळीचा मुद्दा ठरला आहे. मागील लोकसभा निवडणूक बऱ्याच अंशी याच प्रश्नाभोवती फिरली होती. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आगामी दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी चाकण वाहतूक विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेतली.

या बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नागरिकांना दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी कन्टेनरसह सर्व जड वाहनांची वाहतूक सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत बंद ठेवावी. तसेच तळेगाव चौकातील एस.टी., पीएमटी व खासगी बसेसचे थांबे १०० मीटर पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चौकात उभ्या राहणाऱ्या सहा आसनी रिक्षा व इतर वाहनांना चौकापासून १०० मीटर हद्दीपर्यंत पार्किंग करण्यास मज्जाव करावा. तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना दिल्या.

तळेगाव चौकाच्या चारही बाजूला रस्त्याला पडलेले खड्डे बुजविल्यास वाहनांना डावीकडे वळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल असे सहायक पोलीस आयुक्त कट्टे यांनी सुचवताच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करुन चौकातील वळणावरचे खड्डे तत्काळ बुजविण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक शिनगारे, राम गोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Previous articleदौंड महाविद्यालयात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष