आमदार बेनके, माजी आ. सोनवणे, आशाताई बुचके व सत्यशिल शेरकराच्या दारात दिवाळी पूर्वी शिमगा..?

नारायणगाव : किरण वाजगे

जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या सह जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर यांच्या घरासमोर येत्या गुरुवारपासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी व तृतीयपंथीयां समवेत सलग चार दिवस हे ठिय्या आंदोलन होणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना न विचारता विजजोड तोडण्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते आंबादास हांडे यांनी सांगितले.

या आंदोलनामुळे सर्व प्रमुख पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर दिवाळीपूर्वी शिमगा होणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. येत्या गुरुवारी दि. २८ पासून आमदार बेनके यांचा निवासस्थानी पहिल्या दिवशी, त्यानंतर अनुक्रमे माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर चे चेअरमन सत्यशिल दादा शेरकर व जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या निवासस्थानी हे आंदोलन होणार आहे.

दरम्यान या आंदोलनानंतर देखील शेतकऱ्यांवर अन्याय सुरूच राहिला तर “किल्ले शिवनेरी पासून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास स्थानापर्यंत” प्रतीकात्मक अंतयात्रा काढण्यात येईल. असा इशाराही हांडे यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मणशेठ शिंदे संजय भुजबळ, प्रमोद खांडगे, अजितदादा वाघ, सतीश काकडे, नामदेव भटकळ, रभाजी वाजे, महेंद्र ब्राह्मणे, किसन काचळे, बाळासाहेब कामठे, संभाजी लेंडे, संतोष लेंडे, योगेश लेंडे, अजित लेंडे, अशोक विटे, तान्हाजी वाळुंज आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.

Previous articleउद्योजक सुजितराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न
Next articleपै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब रूग्णांसाठी रुग्णवाहिका ; आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते रूग्णवाहिकीचे लोकार्पण