आईवडील व शिक्षकांच्या आशीर्वादामुळे अभिनेता ते नेता हा प्रवास यशस्वी- खासदार डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव, किरण वाजगे

आईवडील व शिक्षकांच्या आशीर्वादामुळे अभिनेता ते नेता हा प्रवास यशस्वी ठरला आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
नारायणगाव येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील १९७५ साली एसएससी मध्ये शिक्षण घेतलेल्या सुमारे १०० विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलत होते. रविवार (दि.१७ ) ऑक्टोबर रोजी विद्यामंदिराच्या वसंतव्हिला सभागृहात हा मेळावा उत्साहात पार पडला.

याप्रसंगी खासदार कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघात अवघ्या दोन वर्षात २७ हजार कोटी रुपयांची विकास कामे आपण आणली. लवकरच पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे सुरू होणार असून अवघ्या अर्ध्या तासात नारायणगाव ते पुणे अंतर पार करता येईल. येत्या काही दिवसात पूर्णत्वास येणारा इंद्रायणी मेडिसिटी हा आरोग्यदायी प्रकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरेल.

यावेळी आमदार अतुल बेनके यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना म्हटले की, मला जर माझ्या वडिलांनी पुणे येथे शिकायला पाठवले नसते तर कदाचित मी आज आमदारा ऐवजी केवळ सरपंच पदापर्यंत झेप घेऊ शकलो असतो. मी व खासदार अमोल कोल्हे समवयस्क असून शालेय जीवनात आमच्यात एक प्रकारे स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत नेहमी डॉक्टर अमोल कोल्हे सरस ठरले असल्याची कबुली देखील आमदार बेनके यांनी दिली.

यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर, तसेच तत्कालीन माजी मुख्याध्यापक सुरेश गोसावी सर, हेमलता सोहोनी मँडम, सुरेश आंबेडकर सर, सुखदेव भोर सर, बबनराव पडवळ सर, अरविंद मेहेर, डी.के. भुजबळ, मुख्याध्यापक रविंद्र वाघोले सर तसेच खासदार कोल्हे व आमदार बेनके यांच्या मातोश्री रंजना कोल्हे, राजश्री बेनके, इतर शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या प्रांगणात असलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या मुर्तीला तसेच गुरूवर्य सबनीस साहेबांच्या समाधीला व पुतळ्याला अभिवादन केले.

या कार्यक्रमात खा.डॉ कोल्हे व आमदार बेनके यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनिलतात्या मेहेर, सुरेश गोसावी, सोहोनी मँडम, मुख्याध्यापक वाघोले, राजश्री बोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक माजी विद्यार्थी ४५ वर्षांनंतर एकत्र आल्यानंतर अक्षरशः भारावून गेले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजश्री बोरकर, संध्या वायकर, दिलीप निंबाळकर ,संध्या भुजबळ, सदानंद भोसले, सिताराम खेबडे, नंदकुमार श्रीवत, सतिश लालू दळवी, सतिश पाटे,अजित पवार, सुशिला वाजगे, कोल्हे, पाटे, खैरे, खिवंसरा, गांधी, भुजबळ, मेहेत्रे, वऱ्हाडी, वाणी, गावडे, फुलसुंदर, तांबे, औटी, वायकर, वारूळे, वाजगे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट दिलीप निंबाळकर यांनी, सूत्रसंचालन संध्या वायकर यांनी केले तर आभार राजश्री बोरकर यांनी मानले.

Previous articleनारायणगाव मध्ये रोटरी जल परिषदेचे आयोजन
Next articleहवेली तालका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या अध्यक्षपदी संतोष कांचन यांची निवड