नारायणगाव मध्ये रोटरी जल परिषदेचे आयोजन

नारायणगाव ,किरण वाजगे

 

रोटरी क्लब नारायणगाव हायवे, रोटरी क्लब नारायणगाव आणि ,ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी,रोटरी क्लब आळेफाटा मेन ,रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने “रोटरी जल परिषद अंतर्गत जलव्यवस्थापन तंत्रज्ञान सर्वांसाठी” या विषयावर जल परिषदेचे आयोजन करण्यात आले.

 

या परिषदेत कार्यक्रमाचे रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे प्रेसिडेंट रो. शिवाजी टाकळकर यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाबद्दल नियोजन व रूपरेषा आणि भविष्यातील उपक्रमाचे नियोजन सांगितले. डॉ.लहू गायकवाड यांनी लेखन केलेल्या शिवकालीन जलनीती हे पुस्तक देऊन उपस्थितांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी रोटरी क्लब चे विशेष कौतुक केले तसेच पाण्याविषयी चे महत्व आणि शेती ही पाण्यावर अवलंबून आहे व त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.

 

रोटरी जल परिषदेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ,बोरवेल दुरुस्त जिवंत करणे, शेतातील बोरवेल रिचार्ज करणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन डॉ.व्यंकटेश घोडके (वरिष्ठ जल भू वैज्ञानिक) यांनी केले. शेतात रिमोट सेन्सर वापरून अति कोटेकोर पाण्याचा वापर व शेताच्या फोटोवरून पिकाला किती पाण्याची गरज सांगणारे मोबाईल ॲप बद्दल माहिती व विशेष मार्गदर्शन रवींद्र उजंगवार यांनी केले. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी कचऱ्याचे नियोजन करून त्यापासून उत्तम प्रतीचे कंपोस्ट तयार करून सेंद्रिय शेती करू शकतो असे आवाहन त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना केले. पाण्याचे प्रदूषण कमी होऊन जमिनीचा कस चांगल्या पद्धतीने कसा सुधारेल या विषयी मनोज धारप यांनी मार्गदर्शन केले.

सांडपाण्याचे ओढ्यातच नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण कसे करावे? याविषयी मोहनीश जाजू यांनी मार्गदर्शन केले. हायड्रोपोनिक चारा निर्मिती करताना गहू,बाजरी, ज्वारी यापासून उत्तम पद्धतीने चारा निर्मिती करू शकतो व हा चारा जनावरांना पचण्यासाठी हलका असतो त्यामुळे प्राण्यांची प्रजनन क्षमता वाढते या संदर्भात शामराव थोरात यांनी मार्गदर्शन केले.

 

पाणी संवर्धन, पाणी व्यवस्थापन व पाण्याच्या वापरामध्ये मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा त्याचप्रमाणे पाणी प्रदूषण समस्या व त्याच्या उपाययोजना सांगितल्या. फळबाग, फुलबाग फक्त १५% पाण्यामध्ये आपण फुलवू शकतो व ८५% पाण्याची बचत करू शकतो. शेतातील पिकांना खत व्यवस्थापन कसे करावे नवीन तंत्रज्ञानाची कशी जोड देता येईल, पाण्याविषयीच्या महत्व हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवा पिढी पर्यंत पोहोचवता येईल असा अनमोल संदेश परिषदेच्या मद्यमातून डिस्ट्रिक्ट डायरेक्टर W.A.S.H. सतीश खाडे यांनी अध्यक्षीय मनोगतातुन व्यक्त केला .

 

या कार्यक्रमासाठी अरुण चिखले, सचिन घोडेकर, योगेश भिडे, रुपेश शहा , हितेंद्र गांधी, कृषी अधिकारी बनकर साहेब ,अविनाश ढोबळे , खोडदच्या सरपंच सविता गायकवाड, रवींद्र माळी, डॉ. पंजाब कथे, रवींद्र वाजगे, रामभाऊ सातपुते, अंबादास वामन (I.P.P.), डिस्ट्रिक्ट 3131 W.A.S.H.यांची सर्व टीम त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील विविध गावांमधील सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लब नारायणगाव हायवे ,रोटरी क्लब नारायणगाव ,रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी, रोटरी क्लब आळेफाटा मेंन ,रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल मधील सर्व सदस्य,ग्रामोन्नती मंडळ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, ग्रामस्थ व शेतकरी असे एकूण १७५ जण परिषदेत सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन वैशाली मोढवे ,मधुरा काळभोर, विनोद पाटे, आबा जगदाळे एनएसएस कार्यक्रम अधिकारी स्वप्निल कांबळे, योगेश खरमाळे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले. मंगेश मेहेर यांनी आभार मानले.

Previous articleभाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या हवेली तालुका अध्यक्षपदी अतुल शेलार यांची निवड
Next articleआईवडील व शिक्षकांच्या आशीर्वादामुळे अभिनेता ते नेता हा प्रवास यशस्वी- खासदार डॉ. अमोल कोल्हे