वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या शुभांगी कानडे यांचे सदस्यत्व रद्द

नारायणगाव (किरण वाजगे)

वारुळवाडी गावच्या वार्ड क्रमांक तीन च्या ग्रामपंचायत सदस्या शुभांगी शाम उर्फ श्याम कानडे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

ग्रामपंचायत सदस्या शुभांगी कानडे यांनी आपल्याला तीन मुलं असल्याची बाब निवडणूक अर्जामध्ये जाहीर न करता दडवली होती. म्हणून याबाबत संतोष वारुळे, मिना वारूळे तसेच सतेज भुजबळ आदींनी शुभांगी कानडे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या अनुषंगाने दि. ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार तीन अपत्य असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज – १) यानुसार कानडे यांचे सदस्यपद रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

दरम्यान वेगवेगळ्या कारणामुळे एकूण सदस्यांपैकी सत्ताधारी गणपिरबाबा ग्रामविकास पॅनल चे अजून तीन ते चार सदस्य अडचणीत आले आहेत. या चार सदस्यांवर वेगवेगळ्या कारणांमुळे अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत भागेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सतेज भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. तसेच भागेश्वर ग्रामविकास पॅनलच्या श्याम दुधाने या सदस्याचा मृत्यू झाल्याने ती जागा देखील रिक्त झाली आहे. यामुळे वारुळवाडी गावच्या राजकीय गोटामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Previous articleकळमोडीत डिजिटल सातबारा उताऱ्यांचे वाटप
Next articleवारूळवाडी हद्दीत अनोळखी १९ ते २० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला