ग्राहकांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडले नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करू – तानाजी तांबे

नारायणगाव ( किरण वाजगे )

कोणतीही पूर्वसूचना न देता ओतुर (ता. जुन्नर) येथील वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कार्यकर्ते व मनसेचे पदाधिकारी तानाजी तांबे यांनी वीज जोड पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महाविकास आघाडी कडून सर्वसामान्य वीज ग्राहकांना गाजर दाखवलं गेलं की , कोरोना काळातील ग्राहकांचे संपूर्ण वीजबिल माफ करू. वीज बील माफ करण्याचे आश्वासन कुठे गेले असा सवाल मनसेचे पदाधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी नारखेडे यांना केले आहे.

या परिसरातील वीज ग्राहक आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत तसेच शेतमजूर सर्वसामान्य नागरिक आहेत. यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीररित्या वीज ग्राहकांची वीज कनेक्शन थेट पोलवरून कट केल्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज ग्राहकांना कोणतीही सूचना न देता त्यांचा वीजप्रवाह खंडित करणे हे बेकायदेशीर आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तानाजी तांबे यांनी वीज वितरण चे मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता नारखेडे यांच्याकडे वीज ग्राहकांच्या तोडलेल्या कनेक्शन बाबत पन्नास टक्के रक्कम भरून वीज जोड पूर्ववत करावेत व उर्वरित रक्कम तीन हप्त्यात भरून घ्यावी अशी मागणी केली आहे.

याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा तानाजी तांबे यांनी दिला आहे.

Previous articleकॅनॉल चाऱ्या दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची
Next articleराजगुरूनगर शहरातील नाभिक संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश