तमाशाचे महिन्याभराचे पैसे घेवून व्यवस्थापक फरार

नारायणगाव ,किरण वाजगे

लोकनाट्य तमाशाचा व्यवस्थापक तथा संचालक कलाकारांचे पैसे घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. याबाबत नारायणगाव (ता.जुन्नर) पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्वाती शेवगावकर सह अंजली शेवगावकर या तमाशाचा व्यवस्थापक एस. के.शेख हा तमाशा कलावंतांच्या पगाराचे पैसे न देता तमाशा कार्यक्रमाचे पैसे घेऊन फरार झाला आहे.या मुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस तमाशा कलावंत,बिगारी व फडमालकीण यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी तमाशा कलावंतांच्या वतीने नंदिनी विजय शिंदे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

नारायणगाव तमाशा पंढरी म्हणून राज्यात प्रसिद्ध असून हे तमाशाचे केंद्र देखील आहे. यात्रा जत्रा तमाशा कार्यक्रमाच्या आगाऊ सुपारी साठी म्हणजेच नोंदणी साठी येथील तमाशा पंढरीत स्वाती शेवगावकर सह अंजली शेवगावकर या फडाची राहुटी एक महिन्या पूर्वी उभारली होती. या तमाशात फडमालकीण स्वाती शेवगावकर यांच्यासह सुमारे चाळीस ते पंचेचाळीस कलावंत व बिगारी आहेत. तमाशा कार्यक्रमाचे पैसे व्यवस्थापक समिर शेख उर्फ एस. के. शेख हा जमा करत असे. मागील एक महिना तमाशा कलावंत या तमाशात काम करत आहेत. ६ मे २०२२ रोजी या तमाशाचा हंगाम संपला. त्या नंतर हिशोब करून तमाशा कलावंत व कामगार यांच्या पगाराचे पैसे न देताच व्यवस्थापक शेख पैसे घेऊन फरार झाला. या मुळे गरीब तमाशा कलावंत व फडमालकीण स्वाती शेवगावकर यांचा मुक्काम सध्या नारायणगाव येथे उभारलेल्या राहुटीत असून मागील तीन दिवसांपासून हे सर्व जण वडापाव खाऊन उदरनिर्वाह करत आहेत.

दरम्यान या तमाशा कलावंतांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन तमाशा फडमालक संघटनेच्या वतीने रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर व संभाजीराजे जाधव यांनी दिले आहे.

Previous articleयुवकांनी व्यसनापासून दूर राहवे – पै.अनिकेत घुले
Next articleपेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस जीएसटीच्या कक्षेत आणुन महागाई वर नियंत्रण ठेवा- भारतीय मजदूर संघाची मागणी