लेखी आश्वासन दिल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी होणारे शेतकऱ्यांचे आंदोलन तुर्त स्थगित : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर होणार बैठक

नारायणगाव (किरण वाजगे)

कालवा सल्लागार समितीची बैठक न घेता जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्याद्वारे २२ जुलै पासून चौदाशे क्युसेक्स ने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या निषेधार्थ शेतकरी संघटनेने येडगाव धरणावर तीव्र आंदोलन करण्याचे ठरवले होते. मात्र हा निर्णय तुर्त स्थगित करण्यात आला आहे.

येडगाव धरणाची उपयुक्त पाणी साठ्याची आजची स्थिती पाहता पाणी सोडणे हे अतिशय अन्यायकारक असल्याची भावना शेतकरी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी येडगाव धरण परिसरात तीव्र आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याचे आश्वासन देऊन या घटनेवर विशेष तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे कुकडी धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लेखी कळविले आहे.

शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, जुन्नर तालुका युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे, उपाध्यक्ष अजित वालझाडे, अजित वाघ, सचिन थोरवे, शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे उपस्थित होते.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने येडगाव धरण परिसरात आज उपस्थित होते. कुकडी प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र रावळे यांनी लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्यामुळे देखील आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती अंबादास हांडे यांनी दिली.

Previous articleनारायणगाव इनरव्हिल क्लबच्या वतीने पांगरी वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट
Next articleजालना – मराठा समाज हल्ला प्रकरणाचे ग्रामीण भागातही तीव्र पडसाद ; नारायणगावात उद्या राहणार सर्व व्यवहार बंद