बेल्हे येथे रस्त्याचे श्रेय वादावरून मोठा वाद

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्याचे आजी माजी आमदार आज पुन्हा एकदा एकमेकांना भिडले.जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी बेल्हे जेजुरी या रस्त्याचे राहिलेल्या कामाचे भूमिपूजन करणारच अशी घोषणा केली होती, परंतु एकदा झालेल्या रस्त्याचे पुन्हा भूमिपूजन करून देणार नाही असा इशारा माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिला होता.आज शनिवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी बेल्हे येथे ग्रामपंचायत कार्यालयसमोर रस्त्याच्या कामाच्या श्रेय वादावरून वादंग निर्माण झाले.

आज सायंकाळी साडेपाच वाजता या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. आमदार अतुल बेनके तसेच माजी आमदार शरद सोनवणे यांच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी होऊन एकच राडा झाला.

यानंतर काही वेळातच येथे माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे यांचे आगमन झाले.
आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, बेल्हा राजुरी रस्त्याच्या पाचशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम मागील आमदारांच्या अनास्थेमुळे रखडले होते. शिवाय काही गावकऱ्यांच्या दुकानांचे अतिक्रमण तसेच काही कारणांमुळे हा रस्ता करण्याचे थांबवण्यात आले होते. परंतु विद्यमान कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्यावर निधी पडला व त्याचे भूमिपूजन आज करण्याचे ठरले. मात्र केवळ राजकारण करत माजी आमदार शरद सोनवणे यांनी या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर शरद सोनवणे यांनी देखील हे काम आधीच मंजूर असल्याचे सांगून भूमिपूजन पुन्हा होऊन देणार नाही असा पवित्रा घेतला. मात्र आमदार बेनके यांनी या सर्व गदारोळात गुलाल भंडारा उधळून व श्रीफळ फोडून रस्त्याचे भूमिपूजन करून घेतले.
यावेळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह उचित पोलीस बंदोबस्त ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडून दिला नाही. यावेळी काही प्रमाणात कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार देखील पोलिसांनी केला.

येथे काही संतप्त ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत आमच्या गावाची अब्रू घालवू नका. तुम्ही निघून जा. असे बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान पोलिसांनी योग्य हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात व आटोक्यात आली. अजून देखील पोलिसांचा बंदोबस्त बेल्हे गावात ठेवण्यात आला आहे. अशी माहिती रवींद्र चौधर यांनी दिली.

Previous articleपत्रकारांचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान ,खपवून घेतला जाणार नाही : स्वप्नील कांबळे यांचा इशारा
Next articleखा.कोल्हे यांनी क्रांती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद