शरद पवार व अजित पवार माझ्या हृदयात; राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या मुद्यावर आमदार अतुल बेनके यांची तटस्थ भूमिका

नारायणगाव (किरण वाजगे)

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपण नेमके शरद पवार यांच्याबरोबर आहोत की अजित पवार यांच्याबरोबर आहोत हे स्पष्ट केले नव्हते. आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण तठस्थ राहणार असून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
जुन्नर तालुक्याचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत आपल्याला मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला असून अनेक सामाजिक कामे त्यांच्यामुळेच झाली असल्याचे सांगून शरद पवार हे आमचे दैवत असल्याचे स्पष्ट केले.

आज नारायणगाव येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आपण पवार कुटुंबाचे उपकार विसरू शकत नसल्याचे सांगून कोणत्याही एका गटाच्या बाजूने आपण राहणार नसून आपली भूमिका तटस्थ असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शरद पवार हे माझे दैवत आहे. परंतु अजित पवार हे माझे नेते आहेत. मी यापुढे पुढील वर्षभर आमदारकीच्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करणार असून आगामी २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची भावनिक भूमिका त्यांनी घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली जोरदार चर्चा काहीशी शांत झाली आहे.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जोरदार कौतुक केले हे सांगताना शरद पवार हे आपले दैवत असल्याचेही सांगितले. आपले वडील माजी आमदार वल्लभ बेनके व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहे. माझेही तसेच संबंध असताना मला नेमकी काय भूमिका घ्यावी हे समजत नसून माझ्या हृदयात शरद पवार व अजित पवार हे दोघेही आहेत. या दोघांशी माझे चांगले संबंध असल्याचे सांगितले. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मी तालुक्यातील आदिवासी समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाजातील सर्व जाती, तसेच खुल्या गटातील सर्वांना बरोबर घेऊन जुन्नर चा विकास करण्यास कटिबद्ध आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. कोणत्याही एका गटाबरोबर जाणार नसून मी तटस्थच राहणार असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले.

जुन्नर व आंबेगाव तालुक्याला कुकडी धरण प्रकल्पाच्या पाण्याबाबतचे काही प्रश्न प्रलंबित असताना मी कोणत्याही एका गटाकडे झुकणार नसून मी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, उज्वला शेवाळे, विनायक तांबे, भाऊ देवाडे, विकास दरेकर, माजी नगरसेवक पठाण, बाळासाहेब खिलारी, अमित बेनके, अशोक घोडके, प्रकाश ताजने, गजानन घोडे, तानाजी डेरे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, गोट्या वाघ, अजिंक्य घोलप, औटी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपाटस येथील नागेश्वर विद्यालयात ३० वर्षांनी भरला ‘मैत्रीचा कट्टा’: दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
Next articleभारतीय जनता पार्टीच्या वतीने छगन भुजबळ यांचे नारायणगावात उत्साहात स्वागत