बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या नातेवाईकांना मिळणार वीस लाख रुपये

नारायणगाव : (किरण वाजगे)

ओतूर (ता. जुन्नर) येथील जाकमाथा शिवारातील शेतकरी पांडुरंग ताजणे यांच्या शेतात कांदे काढण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराच्या बारा वर्षाच्या संजीव बाशीराम झमरे या मुलावर बिबट्याने रविवार (दि. १६ ) रोजी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात या बालकाचा जागीच मृत्यू झाला.

मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या पालकांना शासनाच्या वतीने वीस लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे, परसराम खोकले, किसन खराडे, फुलचंद खंडागळे, साहेबराव पारधी, एम जे काळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व बालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शिवविच्छेदनासाठी पाठवला.

गेली काही महिन्यांपासून बिबट सफारी साठी राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी याबाबत मृत्युमुखी पडलेल्या बालका बाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. याशिवाय वनविभागाकडून देखील पाळीव प्राण्यांबरोबर माणसांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत योग्य ती दखल घेतली गेली नसल्यानेच अशा घटना वारंवार घडत असल्याची टीका स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत मृत बालकाच्या नातेवाईकांना चेक स्वरूपात दहा लाख व बँक ठेव स्वरूपात दहा लाख अशी आर्थिक मदत मिळणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले.

गेले वीस वर्षापासून आत्तापर्यंत ३६ जन बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
दरम्यान अशा पद्धतीने लहान बालकावर बिबट्याचा हल्ला झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे

Previous articleश्री मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त चार कोटींचे संरक्षक विमा कवच ; विक्रांत क्रीडा मंडळाचा उपक्रम
Next articleनारायणगाव यात्रेत राहुल माळीने मनमाडच्या सचिन सुरनरला चितपट करत १ लाख ₹ इनामाची अंतिम कुस्ती जिंकली