नारायणगाव यात्रेत राहुल माळीने मनमाडच्या सचिन सुरनरला चितपट करत १ लाख ₹ इनामाची अंतिम कुस्ती जिंकली

नारायणगाव‌- किरण वाजगे

तीर्थक्षेत्राचा ब दर्जा लाभलेले व नवसाला पावणारे देवस्थान अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामदैवत श्री.मुक्ताबाई देवी व श्री काळोबा देवाच्या यात्रेचा बुधवार (दि. १९) चौथा दिवस कुस्त्यांच्या आखाड्याने गाजला. या आखाड्यात राहुल माळी ने मनमाड च्या सचिन सुरनरला चितपट करत १ लाख रूपये इनामाची अंतिम कुस्ती जिंकली.
बुधवारची सायंकाळ गाजली ती कुस्त्यांच्या दंगलीमुळे. लाल मातीत तब्बल ४ तास कुस्त्यांची दंगल रंगली. रात्री १० वाजेपर्यंत चाललेल्या कुस्त्यांमध्ये राज्यभरातील ४०० पेक्षा जास्त नामवंत मल्लांनी सहभाग घेतला.यामध्ये जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचा कुस्तीपटू राहुल माळी ने मनमाड च्या सचिन सुरनरला चितपट करत १ लाख रुपयांची अंतिम कुस्ती जिंकून ‘नारायणगाव केसरी’ किताब व १ किलो चांदीची गदा पटकावली. तर खेडच्या अरूण केंगले ने ५१ हजार रुपयांची दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली. एकूण ५ लाखांची बक्षीसे यासाठी ठेवण्यात आली होती.

कुस्तीच्या दंगलीत मुलीही मागे नव्हत्या. मुलींच्या कुस्त्याही लक्षवेधी ठरल्या.राजकीय पुढा-यांनी या वेळी मोठी गर्दी केली होती. शिवसेनेचे ठाकरे गट जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे, तसेच अनेक राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यात्रा कमिटीचे अध्यक्ष एकनाथ शेटे, सुजित खैरे, संतोष वाजगे, तसेच सरपंच योगेश पाटे, नारायणगाव विकास सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे, उपाध्यक्ष किरण वाजगे, सुजित खैरे मित्र मंडळाचे पदाधिकारी, डॉ अमोल बेनके यांच्या हस्ते फायनलची कुस्ती लावण्यात आली.

कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यातील विविध भागातील मल्लांसह हरियाणा,राजस्थान,उत्तर प्रदेश येथीलही मल्ल सहभागी झाले होते.

Previous articleबिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या नातेवाईकांना मिळणार वीस लाख रुपये
Next articleचोरी करून चोरट्याने दुकान पेटवले : पाटस येथील घटना