गौतमी पाटील चा कार्यक्रम अनोख्या बंदोबस्तामुळे शांततेत : बंदोबस्तासाठी बाऊंसर, पोलिसांसह महिलांच्या हातात काठ्या

नारायणगाव (किरण वाजगे)

सोशल मीडियावर सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत असलेली तसेच संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील च्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ किंवा वैशिष्ट्यपूर्ण घटना घडत असतात.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळील पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटील च्या डीजे शोचे बुधवार दि. १२ रोजी रात्री उत्साहात आणि भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते.

या ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून येथील आदिवासी महिला भगिनींसह काही महिलांनी सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून हातात काठ्या व दांडकी घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता. गौतमी पाटील चे वैयक्तिक काही सुरक्षा रक्षक तर खाजगी कंपनीचे सुमारे २५ बाऊन्सर म्हणजेच सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. याशिवाय जुन्नर पोलीस स्टेशनचा स्टाफ देखील बंदोबस्तासाठी तैनात होता.एवढेच नव्हे तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होते म्हणून तेथे महिला रसिकांना बसविण्यात आले होते.

त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता जुन्नर तालुक्यात गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला. यापूर्वी ओतुर जवळील फापाळे शिवार येथे एका लग्नाच्या वरातीच्या कार्यक्रमात गौतमीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यावेळी रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये पिकांचे नुकसान केल्यामुळे त्यांना शेतमालकाच्या दगडांचा मार सहन करावा लागला होता. एवढेच नव्हे तर तेथे झाडावर बसलेल्या रसिक प्रेक्षकांना खाली उतरण्यासाठी गौतमीला विनवणी करावी लागली होती.

मात्र पिराचीवाडी येथील वेताळेश्वर यात्रेत सुमारे पन्नास हजार पेक्षा जास्त रसिक प्रेक्षक असताना देखील गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री उद्योग समूहाचे प्रमुख सत्यवान बाळसराफ यांनी केले . याप्रसंगी येणेरे गावचे सरपंच अमोल भुजबळ, देवराम लांडे, वैभव कोरडे, वैशाली ढमढेरे, संजय व-हाडी, निलेश बाळसराफ, किरण वाजगे, अरुण मोरे, एडव्होकेट सचिन चव्हाण, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक मोरडे तसेच हजारो रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

Previous articleउत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगावची सर्वात मोठी रविवारपासून सुरू
Next articleबाळू भवारी तीन वेळा नेट परिक्षा उत्तीर्ण