नारायणगाव जवळ बर्निंग बसचा थरात ; सुदैवाने जीवितहानी नाही

नारायणगाव (किरण वाजगे)

नाशिक बाजू कडून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी आराम बसला नारायणगाव हद्दीत इस्सार पेट्रोल पंपाजवळ मंगळवार दिनांक सहा रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. सुमारे २५-३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या वर्मा ट्रॅव्हलच्या या खाजगी आराम बसचे इंजिन तापल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी व्यक्त केला.

सुदैवाने या बसमधील प्रवासी सुखरूप बचावले असून बस क्र. युपी – ७५ – २६९४ ही प्रवासी घेऊन जाणारी बस पुण्याच्या दिशेला जात असताना नारायणगाव येथील ईस्सर पेट्रोल पंपाजवळ गाडीचे इंजिन गरम झाल्याने गाडीच्या मागून धूर येऊ लागला असल्याची माहिती काही प्रवाशांनी बस चालक पटेल यांना सांगितली. चालकाने त्वरित गाडी बाजूला घेऊन प्रवाशांना बाहेर काढले.

दरम्यान काही वेळातच आगीने रुद्ररूप धारण केले व या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान नारायणगाव पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलास कळवले. मात्र अग्निशमन दल येईपर्यंत बस संपूर्ण जळून खाक झाली होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीत बदल केला व पुढील अनर्थ टळला.

Previous articleग्रामोन्नती मंडळाच्या नारायणगाव वरिष्ठ महाविद्यालयात एड्स जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन
Next articleमहामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन नारायणगावात साजरा