अक्षय बोराडेने यापुढे शिवजन्मभूमीचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल- रूपेश जगताप

नारायणगाव : (विशेष प्रतिनिधी )

सध्या सर्वत्र प्रदर्शित झालेल्या व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असलेल्या बॉईज थ्री या चित्रपटाच्या टीमने शनिवार (दि. १७ )सप्टेंबर रोजी शिवजन्मभूमी जुन्नर येथे आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने येऊन पाच रस्ता चौकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे दर्शन घेतले.

यावेळी जुन्नर नगरीच्या वतीने माजी नगराध्यक्ष श्याम पांडे तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील मेहेर, माजी शहर प्रमुख व नगरसेवक बाबा परदेशी, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी रुपेश जगताप, प्रहार संघटनेचे संतोष कबाडी, चंद्रकांत डोके, नंदकुमार तांबोळी, समिर भगत, तसेच अनेक कार्यकर्ते, नगरसेविका, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या अक्षय बोराडे याने बॉईज थ्री टीम मधील कलाकारांना व तेथे उपस्थित असलेल्या संयोजकांना तुम्हाला काही कळतं का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला चप्पल घालून व शूज घालून अभिवादन कसे करता असे म्हणून गोंधळ घातला असा आरोप मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रुपेश जगताप व प्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष कबाडी यांनी केला.

बोराडे यांनी आरोप करेपर्यंत मात्र या सर्व कलाकार व संयोजकांनी शिवस्मारकाला पादत्राने घालून हार अथवा अभिवादन केले नव्हते. मात्र अक्षय बोराडे यांनी ज्याप्रमाणे तेथे उपस्थित असलेल्यांना स्टंटबाजी करून तुम्ही शिवजन्मभूमीचे नाव खराब करता, असा आरोप केला यावर तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी अक्षय बोराडे याला धक्काबुक्की करून तेथून हाकलून दिले. हे प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेल्यानंतर तेथे माजी नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करून अक्षय बोराडे तेथून निघून गेला. अशी माहिती स्वतः शाम पांडे यांनी दिली.
त्यानंतर अक्षय बोराडे याने आपल्या फेसबुक पेज वरून संबंधित घटनेबाबत वादग्रस्त विधान प्रसारित केले व माजी नगरसेवक बाबा परदेशी यांचा नाव व मोबाईल नंबर फेसबुक पेजवर प्रसारित करून संयोजकांची बदनामी केली.

यावर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटने चे पदाधिकारी रुपेश जगताप व संतोष कबाडी यांनी गुरुवारी (दि. २२) रोजी जुन्नर येथे पत्रकार परिषद घेत अक्षय बोराडे कसा खोटारडा आहे व तो किती वादग्रस्त आहे, याबाबत माहिती दिली. या प्रकरणी १७ सप्टेंबर रोजी शिवस्मारकाच्या जवळ घडलेला प्रसंग तसेच बॉईज थ्री या कलाकारांनी पादत्राणे घातली होती की नाही त्याचप्रमाणे अक्षय बोराडे याला तेथील युवकांनी कसा चोप दिला याविषयी माहिती देऊन संबधित अक्षय बोराडेने यापुढे शिवजन्मभूमीचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा देखील रुपेश जगताप व संतोष कबाडी यांनी दिला.

Previous articleखेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली
Next articleजुन्नर मधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत करून त्यांचे कर्ज माफ करा – किसान सभा