नारायणगावात मध्यरात्री दीड वाजता सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन

नारायणगाव : ( किरण वाजगे)

नारायणगाव व परिसरामधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक दुपारनंतर पाऊस न आल्याने उत्साहात व वाजत गाजत पार पडली. सर्वात शेवटी विरोबा गणेशोत्सव मंडळ व विक्रांत क्रीडा मंडळाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होत्या. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे वारूळवाडी येथील नवशक्ती मंडळांने सादर केलेला बिबट सफारी देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरला. अखेरच्या विक्रांत क्रीडा मंडळ वाजगे आळीच्या गणपतीचे सव्वा ते दीड वाजण्याच्या सुमारास विसर्जन झाले.यावेळी आमदार अतुल बेनके तसेच सरपंच योगेश पाटे यांनी नारायणगावातील सर्वच गणेश मंडळांना भेटी दिल्या.

गावातील प्रमुख मंडळांपैकी औदुंबर गणेश मंडळ, मुक्ताबाई मंडळ विटे कोराळे मळा, शिवझुंजार मंडळ खैरे मळा, नवनाथ मंडळ वाजगे डिंबळे मळा, गणेश मित्र मंडळ शेटे मळा, नारायणवाडी मंडळ, हनुमान चौक, श्रीराम चौक, महासुर्योदय मित्र मंडळ, प्रियदर्शनी मित्र मंडळ, संत सावतामाळी मित्र मंडळ कोल्हे मळा,भागेश्वर मित्र मंडळ, नव झुंजार मित्र मंडळ चिमणवाडी, नवशक्ती मित्र मंडळ, प्रगती मित्र मंडळ, यावर्षी नव्याने सुरू झालेले वेध मित्र मंडळ, इंदिरानगर मावळे आळी, कुलस्वामी मंडळ पेठ आळी, शिवविहार मित्र मंडळ, नारायणगाव एसटी डेपो व आदर्श मित्र मंडळ या सर्वच सार्वजनिक मंडळांनी आकर्षक फुलांच्या सजावटी करून मिरवणुकीत सहभाग घेतला.

विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नवशक्ती मित्र मंडळ वारूळवाडी यांनी बिबट सफारी बाबतचा देखावा सादर केला. तसेच गणेश मित्र मंडळ शेटे मळा यांनी फुलांनी सजवलेला नागराज रथ, विरोबा मंडळ पाटे आळीचा प्रकाश रथ, वाजगे आळीचा मूषक रथ, नऊ झुंजार चिमणवाडीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ज्वलंत देखावा, संत सावतामाळी मित्र मंडळाचे ढोल लेझीम महिला पथक, महासूर्योदय मित्र मंडळाची बैलगाडी व पालखी मध्ये ठेवलेला गणेश, औदुंबर मंडळाचा कोरोना विषाणू विषयीचा ज्वलंत देखावा हे गणपती सर्वात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली सार्वजनिक गणेश मंडळे होती.

विसर्जन मिरवणुकीमध्ये नारायणगाव ग्रामपंचायत च्या वतीने स्वागत कक्ष उभारून प्रत्येक गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे तीन टन निर्माल्य व प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

Previous articleनारायणगावात मध्यरात्री दीड वाजता सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन
Next articleअतिवृष्टीमुळे नुकसान झालेला शेतकरी बांधव नुकसान, भरपाई पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये – आमदार अशोक पवार