गरुडझेप मोहिमेचं’ शिवजन्मभूमीत जल्लोषात स्वागत

नारायणगाव : (किरण वाजगे)

आग्रा ते रायगड अशी साहसी यात्रा म्हणजेच ‘गरुडझेप मोहिमेचं’ शिवजन्मभूमीतील नारायणगाव येथे पारंपरिक ढोल ताशा पथकांनी जल्लोषात स्वागत केले.छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला होता. क्षणार्धात सगळे वातावरण शिवमय होऊन गेले.

मुळशीचे शिवप्रेमी ऍड. मारुती गोळे यांनी १७ ऑगस्टपासून ‘आग्रा ते राजगड’ अशी गरुडझेप मोहीम आयोजित केली आहे. दिग्विजय जेधे या मोहिमेचे सहसंयोजक आहेत. या मोहीमेत सुमारे १ हजार १८२ युवक सहभागी झाले असून १३ दिवसांत तब्बल १ हजार ३०० किलोमीटर अंतर कापणारी ही साहसी मोहीम शुक्रवार (दि.२६ )रोजी सायंकाळी नारायणगावात पोहचली.

तब्बल ९९ दिवस म्हणजे ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ आग्रा येथे कैदेत काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आणि गनिमीकाव्याने औरंगजेबाची अभेद्य कैद भेदून राजगडाकडे, आपल्या महाराष्ट्राकडे प्रयाण केलं! हिंदुस्थानचा बादशहा म्हणवणाऱ्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सह्याद्रीचा हा वाघ आपल्या गडावर परत आला होता. तेव्हा रयतेला जो आनंद झाला असेल तो नक्कीच अवर्णनीय असेल.आज याच आग्रा सुटकेच्या आनंदाचा पुनःप्रत्यय या गरुडझेप मोहिमेने दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी चेतवलेलं हे स्फुल्लिंग आज पुन्हा दिसलं.

या धाडसी मावळ्यांचं आज नारायणगावमध्ये दिमाखात आगमन झालं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सरपंच योगेश पाटे, तसेच जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, अमित बेनके, विकास सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हाईस चेअरमन किरण वाजगे, उपसरपंच आरिफ आतार, संतोष वाजगे, संतोष दांगट, तानाजी डेरे, रोहिदास केदारी, अतुल आहेर, गणेश वाजगे, नारायणगावातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते शिवभक्तानी थाटामाटात, भव्य स्वरूपात या मावळ्यांचं उत्स्फूर्त स्वागत केले.

१७ ऑगस्ट २०२२ रोजी आग्र्याहून निघालेली ही मोहीम २९ ऑगस्ट २०२२ रोजी राजगडावर पोहचणार आहे.
या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मावळ्यांचा नारायणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, व सरपंच योगेश पाटे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Previous articleतब्बल बत्तीस वर्षांनी भरला, इयत्ता दहावीचा वर्ग
Next articleशिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीचे दौंड तालुक्यात जल्लोषात स्वागत ! फटाके फोडून, पेढे वाटून कार्यकर्त्यांचा जल्लोष