स्वर्गीय सुनील वाव्हळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्र शिबिराचे आयोजन

नारायणगाव : (किरण वाजगे)

गुंजाळवाडी तालुका जुन्नर येथील उपक्रमशील शिक्षक स्वर्गीय सुनील वाव्हळ सर यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे नुकतेच करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या हस्ते झाले . नारायणगाव येथे सेवाभावी कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर राहून विक्रांत पतसंस्थेने सहकार क्षेत्रासोबत सामाजिक कार्यातही लौकिक प्राप्त केला आहे. समाजातील वंचित व गरजू लोकांसाठी आरोग्य,शिक्षण क्षेत्रात संस्थेने भरीव कार्य केले आहे.मित्राच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेले विक्रांत संस्थेचे सेवाभावी कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे मनोगत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केले.

विक्रांत पतसंस्थेचे माजी सचिव स्वर्गीय सुनील वाव्हळ यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विक्रांत पतसंस्था आणि डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुंजाळवाडी येथे आयोजित केलेल्या नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शत्रक्रिया शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, गुंजाळवाडीच्या सरपंच रेश्मा वायकर, विघ्नहर देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ.संदीप डोळे, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, पोलीस पाटील मंगलदास सोलाट, उपसरपंच रमेश ढवळे, आरीफ आतार, महेश शेळके, माया डोंगरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अध्यक्ष प्रा.श्रीकांत फुलसुंदर, माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र नरसोडे, विक्रांत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे, सचिव निलेश गोरडे, तबाजी वागदरे, मेहबूब काझी, सतीश निमसे, सुनील ढवळे, संतोष शिंदे इत्यादी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय सुनील वाव्हळ यांनी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षकांसाठी, विशेषतः विनाअनुदानित शिक्षकांच्या न्याय हक्काच्या लढ्यात आमच्या सोबत सर्वत्र संघर्ष करण्याचे काम केले, त्यांच्या निधनानंतर शिक्षक संघटनेने एक लढवय्या कार्यकर्ता गमावला आहे. शिक्षक बांधव स्वर्गीय सुनील वाव्हळ यांचे कार्य कदापी विसरणार नाही असे मनोगत पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.

आदरांजलीपर आशाताई बुचके, संतोषनाना खैरे, योगेश पाटे, रेश्मा वायकर, मंगलदास सोलाट, डॉ.संदीप डोळे, इंतकाब शेख यांनी मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमांतर्गत जुन्नर तालुका रेस्क्यू टीम साठी वाव्हळ कुटुंबीयांकडून सुरक्षा किट देण्यात आले. यावेळी विक्रांत पतसंस्थेने स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवानिमित्त उपस्थित नागरिकांना तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण केले.

या शिबिरात एकूण १२५ नेत्र रुग्णांची तपासणी होऊन ४७ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मुख्य संयोजक संतोष वाजगे यांनी दिली.

शिबिर यशस्वी होण्यासाठी विक्रांत संस्थेचे सर्व पदाधिकारी,कर्मचारी, विक्रांत क्रीडा मंडळ, गुंजाळवाडी येथील विविध संस्था, स्वर्गीय सुनील वाव्हळ शिक्षक मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश गोरडे यांनी केले. सूत्रसंचालन मुकेश वाजगे व अजित वाजगे यांनी केले. आभार अजय कानडे यांनी मानले.

Previous articleसंसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते गुरुवर्य सबनीस विद्यालयात ध्वजारोहण
Next articleकुरकुंभ एमआयडीसी मध्ये भारतीय मजदूर संघाची अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोटार सायकल रँली