नायगाव येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात आजी, माजी शिक्षकांचा स्नेह मेळावा संपन्न

उरुळी कांचन

स्व.भाई के.डी चौधरी यांनी स्थापन केलेल्या पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे रोपटे ज्यांच्या प्रयत्नातून वटवृक्षात रुपांतरीत झाले असे प्रथम मुख्याध्यापक रामचंद्र चोरघे व त्यांचे तत्कालीन सहकारी व सध्या कार्यरत शिक्षक कर्मचारी यांचा स्नेह मेळावा नुकताच विद्यालयात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्याची आठवण रहावी म्हणून विद्यालयात स्मृती वृक्षारोपण करण्यात आले.

दरम्यानच्या काळात जे शिक्षक कर्मचारी काळाच्या पडद्याआड गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करुन मेळाव्याची सुरुवात झाली. माजी मुख्याध्यापक रामचंद्र चोरघे, माजी मुख्याध्यापिका उपाध्ये, रागिणी चौधरी, प्रभाकर पवार, शंकर रणदिवे यांच्या मुख्याध्यापक कार्यकाळातील आठवणी व प्रसंग मनोगतातून व्यक्त केल्या. या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न केसरी मॅडम, देशपांडे , शारदा पानगे, कोळपकर, यशवंतराव कुलकर्णी, अंकुश दाते, आण्णासाहेब चोरघे यांनी सांगितले.

या वेळी विद्यालयातील सहशिक्षक संगीत अलंकार प्रवीण गायकवाड यांच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ‘मर्मबंधातील ठेव ही’ या नाट्यपदाने सर्वच जण भावूक झाले. हा सर्व योग जुळवून आणण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि याच विद्यालयात शिक्षक म्हणून काम करणारे बापूसाहेब गाढवे व स्वाती वाठारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पडवळ, पर्यवेक्षक भारत आडकर यांनी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विठ्ठल ठोंबरे यांनी केले तर आभार दिलीप थोपटे यांनी मानले.

Previous articleसंघटीत- असंघटित ,कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भारतीय मजदूर संघ उतरणार रस्त्यावर
Next articleवाबळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या “परीसस्पर्श” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन