डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्यासाठी व तंदुरुस्तीसाठी वेळ द्यावा : आ.अतुल बेनके

नारायणगाव : (किरण वाजगे)

“दुसऱ्यांच्या आरोग्याची धुरा सांभाळणारे डॉक्टरच सध्या अधिक तणावाखाली असलेले दिसतात. स्वतःच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी , आनंदी राहण्यासाठी आणि स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांनी स्वतःला देखील वेळ द्यायला हवा.”असे मत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी केले.

जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या नविन कार्यकारिणीचा २०२२-२३ या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला.या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके बोलत होते

या वेळी आमदार बेनके म्हणाले की , “डॉक्टरांना आधीच तणाव असतो.त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा तणावयुक्त आणि चिंताग्रस्त चेहरा घेऊन येतो.त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर देखील दुःखी असतात.डॉक्टरांनी दुःखी होऊन बसलं नाही पाहिजे.डॉक्टरांनी कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे, आहार व व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे.डॉक्टरांनी ध्यानधारणा करत स्वतःला आनंदी ठेवून नेहमी हसतमुख राहिले पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने तणावमुक्त आनंदी जीवनाची सुरुवात सुरुवात होईल.”

यावेळी ज्येष्ठ व्याख्याते प्रा वसंतराव हंकारे यांनी देखील सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला ताण-तणाव यामुळे सर्वांच्याच वाटेला आलेली विनाकारण ची धावपळ याविषयी कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली.

या कार्यक्रमाला जेटीएमपीए ट्रस्टचे चेअरमन डॉ.अजित वल्हवणकर, माजी अध्यक्ष डॉ.लुकेश खोत, स्टर्लिंग हॉस्पिटल निगडी येथील कॅन्सर तज्ञ डॉ.अंकोलीकर, फिजिशियन डॉ. अभिषेक करमाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बेनके म्हणाले की, “जेटीएमपीएसाठी जुन्नर तालुक्यात कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.तालुक्यातील डॉक्टरांच्या मिटिंग साठी तसेच वार्षिक कार्यक्रमांसाठी योग्य जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.बायोमेडिकल वेस्टची समस्या सोडवण्यासाठी जुन्नर , आंबेगाव आणि खेड असे तिन्ही तालुक्यांमिळून एकत्र प्रकल्प निर्माण करू.डॉक्टरांची कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

जेटीएमपीएच्या २०२२-२३ या वर्षासाठी अध्यक्षपदी डॉ.हनुमंत भोसले,उपाध्यक्षपदी डॉ.आनंद सराईकर, सेक्रेटरीपदी डॉ. निलेश थोरात आणि खजिनदारपदी डॉ.पिंकी पंजाब कथे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.जेटीएमपीएचे नूतन अध्यक्ष डॉ.हनुमंत भोसले यांनी या वेळी या वर्षात घेण्यात येणाऱ्या नवनवीन कार्यक्रमांची माहिती दिली.

जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचा हा ३६ वा पदग्रहण समारंभ पार पडला.या कार्यक्रमात नारायणगाव येथील ज्येष्ठ डॉक्टर डॉ.एस. जी गोसावी यांना ‘श्रेष्ठ धन्वंतरी पुरस्कार’ देण्यात आला.स्टरलिंग हॉस्पिटल निगडीचे डायरेक्टर डॉ.श्रीकांत अंकोलीकर आणि डॉ. अभिषेक करमाळकर यांची यावेळी वैद्यकीय विषयांवर व्याख्याने झाली.जुन्नर तालुक्यातील सुमारे ४०० डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.

“पुढील कार्यकाळात डॉक्टरांच्या कुटुंबांसाठी विविध उपक्रम घेण्यात येतील.डॉक्टरांचे मानसिक स्वास्थ्य आणि डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल.समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल. अशी माहिती डॉ हनुमंत भोसले यांनी यावेळी दिली.
डॉ. स्मिता डोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.सराईकर यांनी आभार मानले.

Previous articleवाघोली परिसरात सीएनजी पंप चालकाला चार जणांकडून मारहाण
Next articleकाय तो वाघोलीचा बाजार,काय तो बाजारातील चिखल,काय ते कचरा व घाणीचे साम्राज्य,एकदमं ओकेचं !