शिवचरित्र कथाकार ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर यांनी नारायणगाव येथे सलग १२ तास २० मिनिट केले रेकॉर्डब्रेक किर्तन

नारायणगाव : (किरण वाजगे)

पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध किर्तनकार, शिवचरित्र कथाकार ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर यांनी नारायणगाव येथे सलग १२ तास २० मिनिटे किर्तन करून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये नवीन नोंद केली आहे. विविध विषयांवर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, तथापी किर्तनावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे आपण ऐकलं नसेल. मात्र ह.भ.प. बांगर महाराज यांनी ही विक्रमी कामगिरी केली आहे.

कुठलाही सराव नसताना गेली बारा वर्षापासून किर्तन सेवा करणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेतली. पावनखिंडीच्या लढाईत सतरा तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांची प्रेरणा ठरली. १७ तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास किर्तन करू शकतो असा दृढनिश्चय केला. त्यानंतर बांगर महाराज यांनी सलग बारा तास किर्तन करण्याचे ठरविले.

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे प्रमुख पवन सोळंकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया सहभागासाठी हिरवा कंदील दर्शविला.
नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, जयहिंद ग्रुपचे सर्वेसर्वा विजय गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, रमेश भोसले यांच्या सहकार्यातून नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे १४ जून रोजी सकाळी नऊ वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत किर्तनाला प्रारंभ केला. सलग १२ तास २० मिनिटानंतर किर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये आपले नाव कोरले.
या रेकॉर्डसाठी शेमेरो मराठी बाणा चॅनलचे सर्किट हाऊस प्रॉडक्शन दिग्दर्शक सुनील खेडेकर व समन्वयक प्रमोद रणनवरे यांच्या टीमने वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया साठी थेट प्रक्षेपण केले. या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया साठी ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार) व चंद्रकांत निकम (विणेकर) यांच्यासह २२ जणांची साथ लाभली. याचबरोबर टाळकरी, गायक, वादक यांनीही साथ दिली.

१२ तास २० मिनिटांचे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या वतीने मेडल व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच योगेश पाटे , जयहिंद ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, माऊली खंडागळे, रमेश भोसले, जितेंद्र वाजगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हभप बाजीराव महाराज बांगर हे शिव शंभू चरित्र कथाकार म्हणून प्रसिद्ध असून कथाकार, कीर्तनकार, प्रबोधनकार, व्याख्याते, अभिनेते व लेखक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान या राज्यात प्रसिद्ध आहेत. या वर्ल्ड रेकॉर्ड इंडियासाठी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील कार्यकर्त्ये तसेच मुक्ताबाई – काळोबा देवस्थान ट्रस्ट , ग्रामपंचायत नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती जयहिंद ग्रुपचे सचिव विजय गुंजाळ यांनी दिली.

Previous articleआदर्श गाव बस्ती येथील शाळांमध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत
Next articleभोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा