कंटेनरची दुचाकीला धडक : दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

किरण वाजगे

नारायणगाव- मांजरवाडी रस्त्यावर हिवरे तर्फे नारायणगावच्या हद्दीत भोरवस्ती (ता. जुन्नर) येथे कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.या प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

 

या घटनेत वारूळवाडी येथिल कडाळेवस्ती येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबातील रामदास दशरथ केदारी (वय ४२),नारायण दशरथ केदारी ( वय ४० ) या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा सहकारी पोपट होनाजी काळे हे गंभीर जखमी झाले असून ते अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील दोन भावांच्या अपघाती मृत्यूमुळे कडाळेवस्तीवर शोककळा पसरली आहे.

रामदास केदारी यांच्या कुटुंबातील सदस्य आज सकाळी बाजरीचे पीक कापण्यासाठी मांजरवाडी (ता.जुन्नर) येथे गेले होते. दरम्यान रामदास केदारी, नारायण केदारी, पोपट काळे हे तिघेजण दुचाकीने नारायणगाव येथे गेले होते. पुन्हा मांजरवाडी येथे येत असताना हिवरे तर्फे नारायणगावच्या हद्दीत भोरवस्ती येथील वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक बसली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.उपचारापूर्वीच रामदास केदारी,नारायण केदारी यांचा मृत्यू झाला. रामदास केदारी हे पुणे येथे रास्ता पेठेत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीत वायरमन म्हणून सेवेत होते. सुट्टी निमित्त ते गावी आले होते. या प्रकरणी सुरेश केवळे यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलिस करत आहेत.

Previous articleराजगुरुनगर मध्ये हुतात्मा सुखदेव जयंती साजरी
Next articleसावरदरी ग्रामपंचायतच्या गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन