नारायणगाव ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक दिनेश वाव्हळ यांचे हृदयविकाराने निधन

नारायणगाव : किरण वाजगे

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व नारायणगाव ग्रामपंचायत चे वरिष्ठ लिपिक दिनेश जनार्दन वाव्हळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सोमवार (दि. ७ ) रोजी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

दिनेश वाव्हळ हे नारायणगाव येथील सभापती कॉर्नर जवळील वाईकर हॉटेल येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी एकटेच गेले होते. यावेळी हॉटेल बाहेरच्या टेबलावर बसले असता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले व खूप त्रास जाणवला. त्यांना घाम आल्याने हॉटेल चालक शंकर वायकर यांनी त्यांना बरे वाटत नाही का, तुम्हाला दवाखान्यात जायचे आहे का..? असे विचारले परंतु दिनेश यांनी काही नाही, मला घाम आलाय फक्त. मी हॉटेलच्या आतल्या टेबलवर जरा पडतो असे म्हटले. त्यानंतर तेथे काही वेळातच आलेले किरण दारोळे, विशाल पवार, सुरज काकडे यांनीदेखील तुम्हाला त्रास होत असेल तर आपण दवाखान्यात जाऊ असे सांगितले.

परंतु मला काही होत नाही मला लगेच घरी जायचे आहे असे दिनेश यांनी सांगितले. व त्यानंतर काही वेळातच पुन्हा दिनेश यांना त्रास झाला. तेव्हा तेथे उपस्थित असलेले शंकर वायकर, सुरज काकडे, संदीप मते यांनी त्यांना लिंबू पाणी व साखर दिली. त्यावेळी सुद्धा दिनेश हे घामाघूम झाले होते. पुन्हा या सर्वांनी त्यांना त्रास होत असेल तर आपण दवाखान्यात जाऊ असे सांगितले. परंतु काही वेळातच तेथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला व ते जागेवरच कोसळले.

यावेळी तेथे जवळच असलेले सुरज काकडे, मुन्ना शेख, विशाल पवार यांनी संदीप मते यांच्या चारचाकी वाहनातून त्यांना जवळच असलेल्या विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा काही क्षणांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत अर्जुन वाव्हळ, बाळा वाव्हळ, किरण साबळे, कुणाल वाव्हळ, किरण दारोळे व आदित्य खैरे उपस्थित होते. अशी माहिती वाईकर हॉटेलचे मालक शंकर वायकर, बाळा खैरे, सरपंच योगेश पाटे व माजी उपसरपंच संतोष वाजगे यांनी दिली.

अतिशय मनमिळाऊ स्वभाव, मितभाषी असे व्यक्तिमत्व दिनेश वाव्हळ यांचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत कर्मचारी, व्यापारी तसेच गावातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

Previous articleचाकण- छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न
Next articleराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हवेली तालुका सरचिटणीसपदी अजिंक्य तुपे यांची निवड