जुन्नर – किल्ले शिवनेरी ते पुणे लवकरच धावणार PMPL

नारायणगाव,किरण वाजगे

किल्ले शिवनेरी-जुन्नर ते पुणे अशी पीएमपीएल बस सेवा तात्काळ सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी जुन्नर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.ही बस सेवा सुरु करावी. यासाठी भाजप नेत्या आशाताईं बुचके यांनी काही दिवसांपूर्वी पुणे व पिंपरी-चिंचवड च्या महापौरांशी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

जुन्नर ते पुणे PMPML च्या बस सेवेसाठी पिंपरी चिंचवड च्या महापौर माई ढोरे व पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ तसेच PMPML चे आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांची दिनांक २७ जानेवारी रोजी आशाताईं बुचके यांनी भेट घेतली.

याप्रसंगी आशाताई बुचके यांनी सध्या एसटी बस अभावी सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, पर्यटक यांची होणारी गैरसोय महापौर व संबंधित अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली व शिवनेरी – जुन्नर ते पुणे बस सेवा सुरु व्हावी ही विंनती केली. या सर्वच मान्यवरांनी या नियोजित बससेवेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शिवनेरी-जुन्नर ते पुणे बस सेवेस हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सौ बुचके यांनी दिली. या बस सेवेसाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हे देखील अनेक दिवसांपासून आग्रही होते.

दरम्यान याबाबतचे निवेदन देताना आशाताईं बुचके यांच्या समवेत नगरसेवक सचिन दांगट, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे उपस्थित होते. जुन्नर ते पुणे या बस सेवेस आता हिरवा कंदील मिळाल्यामुळे येत्या काही दिवसात ही बस सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जुन्नरच्या नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून आशाताईं बुचके यांचे आभार मानले जात आहेत.

Previous articleकिवळे येथे किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
Next articleशिरोलोतील युवक व युवतींची नारायणगडावर दुर्गसंवर्धन मोहिम