पाटसच्या स्मशानभूमीत गॅस स्मशानभट्टीची मागणी : खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन

योगेश राऊत , पाटस

कसबे पाटस ( ता.दौंड) येथे मुख्य स्मशानभूमीत “गॅस स्मशान भट्टी”(शव दहिनी) बसविणेच्या मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे.

दिवसेंदिवस होणारी लोकसंख्येतील वाढ, कुटुंबा कुटुंबातील कमी होणारे मनुष्यबळ, माणसाच्या अंत्यविधी साठी होणारा खर्च सुद्धा प्रचंड वाढला आहे. अजूनही पारंपरिक पध्दतीने लाकडे व इतर अनावश्यक साहित्य वापरून अंत्यविधी केले जात आहेत. यामध्ये पैसा, पर्यावरण आणि वेळ या सर्व बाबींची हानी होते आहे. आधुनिक पर्याय म्हणजे गॅस स्मशान भट्टी(शव दाहिनी) यामुळे साधारण एका मानवी शव दहन प्रक्रियेकरिता एक सिलिंडर पुरेसे आहे याची किंमत लाकडांच्या किमतीपेक्षा खूपच कमी आहे तसेच कोणत्याही ऋतूत फक्त ४५ मिनिटांत पर्यावरणपूरक व कमी खर्चात,थोड्या मनुष्यबळात अंत्यविधी पूर्ण केला जातो.

यातून आपली परंपरा आणि पर्यावरण याचा निश्चित पणे समतोल राखला जाईल म्हणूनच कसबे पाटस गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत गॅस स्मशान भट्टीची अतिशय गरज आहे. याकरिता पाटस ग्रामविकास फाउंडेशन कडून सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी पाठपुरावा व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच फक्त पाटसच नव्हेतर तालुक्यातील इतरही मोठ्या गावांमध्ये पाटस ग्रामविकास फाउंडेशनने मांडलेली आधुनिक आणि पर्यावरणपूरक संकल्पना राबवण्यात येईल असे सांगितले.

सदर मागणीस प्रतिसाद देत खासदार निधीतून ही गॅस स्मशान भट्टी लवकरात लवकर पाटससाठी उपलब्ध करून दिली जाईल असे सकारात्मक आश्वासन खासदार साहेबांनी दिले आहे.

यावेळी पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे विनोद कुरुमकर, हर्षद बंदीष्टी, गणेश जाधव, राजू गोसावी, नवनाथ शितोळे उपस्थित होते.

Previous articleजुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम
Next articleचांद्रयनाचे चंद्रावर यशस्वीपणे लँडीग