एक ते दीड वर्षे वयाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळला ; हिवरे तर्फे नारायणगाव येथील घटना

नारायणगाव (किरण वाजगे)

हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथील भोर वस्ती, शिवारात शनिवार (दि २५) रोजी सकाळी नऊ वाजता एक १ ते दीड वर्षे वयाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळला.येथील शेतकरी संतोष दत्तात्रय भोर यांच्या गव्हाच्या शेतामध्ये हा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. हा बिबट्या इतर जंगली प्राण्यांबरोबर झालेल्या हल्ल्यामध्ये दगावला असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. दरम्यान येथील शेतकऱ्यांनी या परिसरात होणाऱ्या बिबट्याच्या दहशतीबद्दल तसेच पाळीव प्राण्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याबद्दल खेद व्यक्त करत या भागात पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.

मागील काही महिन्यात या भागातील अनेक पाळीव कुत्री, शेळ्या, मेंढ्या, वासरे बिबट्याने फस्त केले आहेत. शेतामध्ये पिकांना पाणी भरायला जात असताना रात्री अपरात्री तसेच काही वेळा दिवसादेखील बिबट्याचे दर्शन हे नित्याचे झाले आहे.

दरम्यान घटनास्थळी वनरक्षक रामेश्वर फुलवाड, वन कर्मचारी खंडू भुजबळ, विश्वास शिंदे यांनी भेट दिली व पंचनामा केला.

याबाबतची माहिती स्थानिक शेतकरी नितीन भोर व रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे यांनी वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांना दिली.

स्थानिक शेतकरी वसंततात्या भोर, संतोष भोर, ईश्वर अडसरे, रामदास भोर, ओंकार भोर, प्रसाद भोर, तानाजी भोर, बाळू भोर यांनी येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान मृत बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले आहे.

सातत्याने जुन्नर तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर व त्याच्यामुळे नष्ट होणारी शेतकऱ्यांची पाळीव जनावरे याचा विचार करता तालुक्यात प्रस्तावित असलेल्या बिबट सफारीची उभारणी कधी होणार याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत व अतुल बेनके यांनी विधानसभेत बिबट्याच्या प्रश्नाविषयी आवाज उठवला. त्याचप्रमाणे माजी आमदार शरद सोनवणे यांनी तर बिबट सफारीसाठी उपोषण आंदोलने देखील केली. तसेच जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी देखील अनेक वेळा बिबट सफारी विषयी आवाज उठवूनही बिबट सफारीचे कागदी घोडे अजून तरी सरकार दरबारीच नाचत आहेत. तात्काळ जुन्नर तालुक्यात प्रस्तावित असलेली बिबट सफारी साकारावी अशी मागणी अनेक वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे.

Previous articleदौंड तालुक्यातील चौफुला येथे चार चाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार व कागदपत्रांची चोरी
Next articleआपल्या कामांच्या पाट्या लोकांच्या हृदयात लागल्या पाहिजेत –  आमदार दिलीप मोहिते