जाहिरात
जाहिरात
Home Blog Page 122

जुन्नर तालुक्यात आज सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न

 तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या झाली ३८९

नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून आज रोजी एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निष्पन्न झाले आहेत. आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या ३८९ एवढी झाली असून आजपर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यापैकी २४३  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या  १३१  एवढी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज नारायणगाव येथे दोन रुग्ण तर खामुंडी, ओतूर, आळे, आगर व जुन्नर येथे प्रत्येकी एक असे सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
दरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

डॉ.रणजित थोरात व परिवर्तन सोशल फाउंडेशन तर्फे दौंड तालुक्यात आर्सेनिक अलबम 30 गोळ्यांच्या 25000 बॉटल चे वाटप

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड तालुक्यात वाढत्या कोरोना च्या प्रादुर्भावा वरती प्रशासन योग्य ती उपाययोजना करत आहेत, प्रशासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवून कोरोना परिस्थिती कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यासाठी आता तालुक्यातील स्वयंसेवी संस्था ही सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पुढे आलेल्या आहेत,यामध्ये डॉ.रणजीत थोरात व परिवर्तन सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व तालुक्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 25000 बॉटल आर्सेनिक अलबम 30 या होमियोपॅथी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे,4 व्यक्तींसाठी एक बॉटल असे प्रत्येक घरोघरी जावून हे वाटप केले जात आहे, आतापर्यंत देऊळगाव राजे,नाथाची वाडी,खुटबाव,कुरकुंभ, हिंगणीबर्डी,काळेवाडी,मलठण, लोणारवाडी,मळद,दौंड शहर,दौंड शुगर,बोरिबेल येथील नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे,दौंड शुगर या ठिकाणी वाटप करताना पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

दौंड च्या ज्या-ज्या भागात कोरोना रुग्ण सापडत आहेत तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे, यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आधार मिळत आहे, सर्वजन नित्यनियमाने दिलेल्या पद्धतीने म्हणजे 3 गोळ्या रोज उपाशीपोटी सलग 3 दिवस सर्वांसाठी, त्यानंतर प्रत्येक 8 दिवसांनी 3 गोळ्या सकाळी उपाशीपोटी 1 दिवस या गोळ्या घेतात,या सामाजिक उपक्रमांमुळे डॉ.रणजीत थोरात आणि त्यांच्या फाउंडेशन चे आभार मानले जात आहे

खुरपुडीत माती माफीयांचा धुमाकूळ

राजगुरुनगर:  खरपुडी ( ता खेड ) येथे विनापरवाना सुरू असलेले गौण खनिज उत्खनांची चोरी रोखण्यासाठी तलाठी व कोतवाल गेले असता त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ६जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत तलाठी स्वाती चंद्रकांत तावरे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की,खरपुडी (ता खेड )येथील मांडवळा येथे चासकमान धरणाचा डाव्या कालव्यालगत गट क्रमांक ४२४ या गटात बेकायदेशीरपणे विनापरवाना गौण खनिजाचे पोकलॅण्ड द्वारे उत्खनन करून गौन खानिजाची चोरी सुरू होती. याबाबत तलाठी तावरे यांना माहिती मिळाली होती.घटनास्थळी ही होणारी चोरी रोखण्यासाठी व पंचनामा करण्यासाठी तलाठी तावरे व कोतवाल दत्तू छबू चव्हाण हे गेले होते. दरम्यान यातील आरोपी महेंद्र काळुराम भोगाडे ,श्रीधर दगडु चौधरी, प्रविण श्रीधर चौधरी,प्रसाद जालींदर चौधरी, व इ(तर दोघे जण नांव पत्ता माहिती नाही )हे सर्व (रा. खरपुडी बुद्रुक ,ता.खेड यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवुन विना परवाना गौण खनिजांची चोरी करत होते त्यांना पोकलॅण्ड बंद करण्यास सांगितले असता कोतवाल दत्तू चव्हाण यांना ढकलुन दिले. तलाठी तावरे यांना शिवीगाळ दमदाटी केली पंचनामा करताना सरकारी कामकाजात अडथळा आणला. तसेच उत्खनासाठी वापरण्यात पोकलॅण्ड मशीन व डंपर जप्त न करुन देता दमदाटी करून तेथून हलविले.

दरम्यान तावरे यांनी सदर जागेचा पंचनामा करत त्याठिकाणी माती, मुरुम व दगड या गौण खनिजाचे उत्खनन झाले असल्याचा अहवाल तहसीलदार सुचित्रा आमले यांना सादर केला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीसनिरीक्षक निलेश बडाख करत आहे.

पत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल होऊ नयेत अशी” जुन्नर तालुक्यातील पत्रकारांची मागणी

नारायणगाव (किरण वाजगे) – जुन्नर तालुक्यात पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आरोपींसह तक्रारदार यांचीही योग्य ती चौकशी करुन पत्रकारांवर बदनामी करण्याच्या दृष्टीने दाखल करण्यात येणार्‍या गुन्ह्याबाबात चौकशी करुन योग्य तो न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन  मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर तालुक्याच्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना देण्यात आले.

हे निवेदन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदिप पाटील, पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना य‍ांनाही पाठण्यात आले आहे.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला पत्रकारांचे नेहनीच सहकार्य आहे. चुकीच्या पद्घतीने किंवा कायद्याचा दुरुपयोग करुन काही होणार नाही असे सांगत आरोपींसह तक्रारदार यांचीही चौकशी करुन योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया चे अध्यक्ष अतुल परदेशी म्हणाले की, सर्व पत्रकार एकत्र आहेत पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे व पत्रकारांना योग्य न्याय द्यावा अशी भुमिका पत्रकारांच्यावतीने मांडली.

यावेळी अतुल परदेशी, रविंद्र पाटे,  सचिन कांकरिया, सुरेश वाणी, अॅड.कुलदिप नलावडे, अतुल काकंरिया, किशोर चौरे, अशफाक पटेल, पवन गाडेकर, आयुब शेख, दर्शन फुलपगार, मंगेश पाटे, स्वप्निल ढवळे, चेतन बोर्‍हाडे, रफिक शेख, अमर भागवत, तान्हाजी तांबे, सुभाष घुले यांसह प्रिंट व ईलेक्ट्राॅनिक मिडीयाचे व मी एक पत्रकार ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
सदर मिटिंग उपस्थित पत्रकारांची कोरोना सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन संपन्न झाली. यावेळी अतुल परदेशी, सचिन कांकरिया, रविंद्र पाटे, सुरेश वाणी, अॅड.कुलदिप नलावडे यांनी पत्रकार सुरक्षा व पुढील कार्यवाही विषयी मार्गदर्शन केले. या मिटिंगचे प्रास्ताविक प्रा.अशफाक  पटेल यांनी केले तर आभार किशोर चौरे यांनी मानले.

पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमधील वाळूची रातोरात झाली क्रश्ड खडी

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील महसूल विभागाच्या ताब्यातील अन्नधान्य गोडाऊनमधील वाळूचे चार ट्रक चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आलेल्या वाळूच्या ट्रक मध्ये वाळू ऐवजी रातोरात वाळूच्या जागेवर क्रश्ड अर्थात बारीक खडी आल्याची जादू घडली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शिरुर तालुक्यात महसुल आणि पोलिसांचे चाललय तरी काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथे २२ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अवैध्य रित्या वाळू वाहतूक करणारा एम एच १४ एच जि ७२९१ क्रमांकाचा ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिला होता, तर याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे लेखी स्वरुपात माहिती देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर ट्रक चालकाचे नाव देखील पोलिसांना दिले होते, यांनतर पोलिसांनी

याबाबत महसूल विभागाला कल्पना दिल्यानंतर शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांच्या आदेशाने शिक्रापूर गाव कामगार तलाठी अविनाश जाधव यांनी या गाडीत वाळू असल्याबाबत पंचनामा केला असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु आता शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये उभ्या असलेल्या गाडीमध्ये या वाळूच्या जागेवर चक्र क्रशंड असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये रातोरात वाळूची क्रशंड खडी झाली कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अद्याप पर्यंत याबाबत कोणताही गुन्हा शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल नाही. परंतु पोलीस स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या ट्रक मध्ये वाळू ऐवजी क्रशंड दिसून येत असल्याने आच्छर्य व्यक्त होत आहे, याबाबत बोलताना सदर प्रकाराबाबत कोणतीही माहिती नसून वाळू व्यावसायिकांनी त्यांचा दंड चुकविण्यासाठी ट्रक मध्ये वाळूच्या वर क्रशंडचा थर दिला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे परंतु पोलीस स्टेशन मध्ये असे प्रकार होत असताना पोलिसांच्या साथीमुळेच शक्य असल्याचे बोलले जात आहे तर याबाबत शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता सदर वाहन पोलीस स्टेशनमध्ये उभे आहे त्यामुळे याबाबत काय ते पोलिसांनाच माहिती आम्ही काही सांगू शकत नाही असे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठा महासंघ करणार संपूर्ण दौंड निर्जंतुकीकरण केले जाणार

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

दौंड शहरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने संपूर्ण दौंड शहरात फवारणी करून शहर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे,यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने आवश्यक ती परवानगी घेतलेली आहे.पुणे जिल्हा संघटक विक्रम बाबा पवार यांच्या या संकल्पनेला समाजातून सकारात्मक प्रतिसाद येत आहे तर काहीनी सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य व प्रत्यक्ष मदत देखील करण्याची तयारी दर्शविली आहे.

दौंड शहरामध्ये दिवसेंदिवस कोविड-19,कोरोना चे रुग्ण सापडत आहे, दौंडच्या प्रत्येक भागात रुग्ण सापडत आहे, एकाच घरात रुग्ण सापडत असल्याच्या घटनाही घडत आहेत,यावरती दौंड नगरपालिका चा आरोग्य विभाग प्रत्येक भागात वेगवेगळ्या उपाय योजना राबवित आहे,नगरपालिकेचा आरोग्य विभाग सर्वोतोपरी पर्यंत करत आहेत,पोलीस प्रशासन ही वेगवेगळ्या उपाय योजना राबवून या परिस्थितीवर आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे.यांना मदत व्हावी म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने संपूर्ण शहरात फवारणी केली जाणार आहे.राष्ट्रीय सरचिटणीस-मा.श्री.राजेंद्र कोंढरे,राष्ट्रीय अध्यक्ष-मा.श्री.शशिकांत पवार, पुणे जिल्हा अध्यक्ष-मा.श्री.गुलाबराव गायकवाड ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष-मा.श्री.आनंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे,दौंड तालुका अध्यक्ष-दादासाहेब नांदखिले,युवक पुणे जिल्हा सरचिटणीस-मयूर सोळसकर, दौंड शहर अध्यक्ष-उमेश वीर,दौंड शहर युवक अध्यक्ष-अविनाश गाठे, दौंड तालुका सचिव-आशिष शिंदे,दौंड शहर सचिव-प्रमोद खागल,दौंड तालुका युवक सचिव-विकास जगदाळे,रोहन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यात येणार आहे, या उपक्रमात इच्छुकानीं समाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सहभागी व्हावे.

दौंड कॉलेज चे ऑनलाइन ऍडमिशन सुरू

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

दौंड तालुका कला वाणिज्य महाविद्यालय दौंड चे शैक्षणिक वर्ष 2020-21 चे Fy, Sy, Ty, BA, MA(,कला शाखा) Fy,Sy, Ty, Bcom, Mcom(वाणिज्य शाखा),11वी,12वी,कला व वाणिज्य,इलेक्ट्रॉनिक्स,ओ.इम.ऑटो.या वर्गांचे प्रवेश *ऑनलाईन* पध्दतीने सुरू करण्यात आले आहेत.
दौंड कॉलेज हे दौंड तालुक्यात शिक्षणाच्या बाबतीत अग्रगण्य कॉलेज आहे, यामध्ये सर्व च विषयात विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले आहे, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, शासकीय रोजगार मेळावा, निर्भय कन्या अभियान,सॉफ्टस्किल,परिसर अभ्यास,राष्ट्रीय सेवा योजना, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर,क्रीडा विषयी मार्गदर्शन,अभ्यास सहल,वाणिज्य शाखेसाठी प्रकल्प भेट,स्पर्धा परीक्षा केंद्र,वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या मान्यवरांचे व्याख्यान,विद्यार्थीनिसाठी स्वयंसिद्धा अभियान, यासारखे उपक्रम राबविले जातात,राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, राज्यस्तरीय नाट्य,नृत्य,पथनाट्य स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे याबाबतीत महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात,महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विकास मंडळ,राष्ट्रीय सेवा योजना,व इतर योजना आहेत ज्याद्वारे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होते,इथे विद्यार्थी ज्ञानाने,वक्तृत्वाने,कर्तृत्वाने, प्रभुत्वाने घडवण्याचा प्रयत्न केला जातो, नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक वर्ग PHD धारक,सुवर्णपदक मिळवलेले,वक्तृत्व पुरस्कार विजेते, लेखक,असे यशस्वी ठरलेले अनुभवी प्राध्यापक आहेत. आतापर्यंत या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी कामगिरी बजावली आहे.
विद्यार्थ्यांनी http://dtac.vriddhionline.com या लिंकवर आपला प्रवेश घ्यावा.
प्रवेश घेतेवेळी माहितीसाठी संपर्क:-
1)प्रा.महेश माने-9860483638

2) प्रा.बबन माने-9270076500

3)प्रा.अभिजित येडे- 9860805908

4) आरती पाटील मॅडम- 8830311399

5)दिनेश पवार- 8308310208

अधिक माहितीसाठी प्राचार्य- जयंत ढेकणे -9422567323

पोटात व हातावर सुरीने वार करणाऱ्या चुलत भावावर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे)

किरकोळ कारणावरून चुलत भावाने पोटात व दंडावर सुरीने वार केल्याबद्दल एक जणांवर नारायणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

याबाबत विशाल ज्ञानेश्वर मेहेर (राहणार वारूळवाडी, ता. जुन्नर) याच्यावर भा.द.वि. कलम ३०७, ५०६ नुसार दिनांक २६ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महेश सुरेश मेहेर (वय ३०, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार वारूळवाडी ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की,आमच्या मालकीच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर का आणला असा जाब विचारत अंगावर धावून येऊन तसेच एका एकाला खलास करून टाकतो, अशी धमकी देऊन आरोपी विशाल ज्ञानेश्वर मेहेर याने खिशातील सुरी महेश मेहेर यांच्या पोटात खुपसली व डाव्या हाताच्या दंडावर मारून गंभीर दुखापत केली. ही घटना वारूळवाडी तालुका जुन्नर येथील पाण्याच्या टाकीजवळ दिनांक २६ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेवरून आरोपी विशाल ज्ञानेश्वर मेहेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. सी. झिंजुरके हे करीत आहेत.

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनिधी

‘कोरोना’चा सामना करताना, विकास कामांनाही गती द्यावी. सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत शासनस्तरावरील कामे तात्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
पुण्यातील वडगाव शेरी (नगररोड) भागातील रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली.

बैठकीला आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, अधीक्षक अभियंता विजय शिंदे तसेच वन व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.खराडी ते शिवणे नदीकाठच्या रस्त्यासह नगररोडवरील रस्त्यांच्या प्रलंबित कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

सार्वजनिक हित लक्षात घेऊन येथील रस्त्यांची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगाने प्रशासन स्तरावरील प्रश्न स्थानिक आमदार, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने सोडवावेत असे आदेश अजित पवार यांनी दिले.
वनविभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागांच्या मंजुरीसाठीचे प्रस्ताव शासनाला तातडीने सादर करावेत, त्यामुळे शासनस्तरावरील कामे लवकरच मार्गी लावता येतील, असेही अजित पवार म्हणाले. नगररोड भागातील उड्डाणपुलाच्या कामाबाबत स्थानिक आमदार व महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन तो विषय मार्गी लावावा असे सांगून विकास कामांच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिकेचे संबंधित विभाग, वन विभाग व अन्य संबंधित विभागांनी समन्वय साधून पाठपुरावा ठेवून रस्त्यांची विकास विकासकामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.
आमदार सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी मतदार संघातील रस्त्यांच्या प्रलंबित कामांची माहिती दिली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामांसाठी पाठपुरावा करु असे सांगितले.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामे पूर्ण होण्यात प्रशासकीयस्तरावर येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन प्रलंबित कामे गतीने पूर्ण करुन घेऊ असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या कार्यध्यक्षपदी संध्याताई शिंदे यांची नियुक्ती

बाबाजी पवळे, चाकण- राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या कार्यध्यक्षपदी संध्याताई शिंदे यांची नियुक्ती पुणे विभागाच्या अध्यक्षा मीनाताई शिंदे यांनी केली आहे.त्यांच्या कार्यध्यक्षपदी निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष मीनाताई मोहिते यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी असंघटित कामगार विभागाच्या पुणे जिल्हा अध्यक्षा मिनाताई मोहिते, यावेळी नितीन गायकवाड पुरुष पुणे जिल्हा, कार्याध्यक्ष जयश्री प्रसाद,पुणे जिल्हा उपाध्यक्ष गायत्री असवले,पुणे जिल्हा सचिव महिला अँड. इंगळे, कायदेविषयक सल्लागार पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सलीम अत्तर,सदस्य भूषण शिरसाठ, अरुण अवधूत आदी मान्यवर उपस्थित होते

असंघटित कामगारांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी शिंदे यांनी दिली. असंघटित कामगारांवर राज्यभरात अन्याय होत आहे. समाजातील एका प्रकारे असंघटित कामगारांना न्याय मिळत नाही. संस्थांकडून त्यांची पिळवणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मोठी कामगार ताकद आहे. या कामगारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्कीच न्याय देईल, अशी खात्री संध्याताई शिंदे यांनी दिली.

20,829FansLike
0FollowersFollow
68,557FollowersFollow
0SubscribersSubscribe