पुर्व हवेलीतील रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुर्व हवेली तालुक्यात एमएसआरडीसी चा
रिंगरोड मंजूर झाला अशी अनेक वेळा प्रशासनाकडून दिशाभूल करून मार्च महिन्यात अखेर हा फेरआखणी केलेला रिंगरोड मंजूर झाला. यापूर्वीही सन २०१६ साली या रस्त्याला मान्यता दिली होती. वाडेबोल्हाई, गावडेवाडी, बिवरी, प्रयागधाम, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, वडकी या गावातील शेतकर्यानी सन २०१६ पासून या रिंगरोडमधील सर्व त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. या बाधित शेतकर्यानी ह्या संपूर्ण रिंगरोडची आखणी शास्त्रीय दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या बरोबर नसल्याचे लेखी कळविले होते.

पुर्व भागाला यापूर्वीचे दोन रिंगरोड मंजूर आहेत ते जाणीवपूर्वक विकसित केले जात नाही. ते विकसित करणे गरजेचे आहे. हे जवळचे रस्ते आहेत. तसेच पीएमआरडीए चे बैठकीत माजी मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार हा एम.एस.आर.डी.सी.चा रस्ता पी.एम.आर.डी.ए.चे रिंगरोडपासून २० ते २५ किमी अंतरावर असावा असे ठरले होते. तसेच हा रिंगरोड हितावह नाही व हा रस्ता रद्द करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घ्यावा असे नगररचना पुणे यांनीही कळविले होते. तसेच या अन्यायाविरूध्द बाधित शेतकर्यानी रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेच्या वतीने मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अशी माहिती रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेचे महेंद्र झेंडे व काळूराम गोते यांनी दिली. या फेरबदलाप्रमाणे लवकरच दुरुस्त याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार आहे. ही आखणी चुकीची आहे असे बर्याच अधिकारी यांनी खाजगीत सांगितले होते. काहींनी उघडपणे सांगितले तर त्यांची बदली करण्यात आली. ही आखणी चुकीची आहे हे एम.एस.आर.डी.सी.चे अधिकारी यांनीही खाजगीत मान्य केले होते.

तरीसुद्धा मूळ आखणीतील सोरतापवाडी ते वडकी ते खेड शिवापूर ही फक्त अंशतः आखणी बदलण्यात आली. प्रयागधाम, बिवरी, गावडेवाडी, वाडेबोल्हाई, ते मरकळ सोळू या ठिकाणची आखणी तशीच ठेवण्यात आली. यामध्ये बदल केला नाही.

प्रयागधाम, बिवरी, गावडेवाडी, वाडेबोल्हाई, शेतकर्यांची बिवरी (गोते) येथे बैठक झाली. त्यावेळी शेतकर्यांनी या गावातील आखणीस विरोध केला आहे. ही आखणी केवळ अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी व वाडेबोल्हाई येथील प्रिस्टेस फॅक्टरी यांचेसाठीच केली आहे असा आक्षेप अनेकांनी पुन्हा घेतला आहे. या कंपन्यामध्ये केंद्रीय मंत्री व एक खासदार यांचे शेअर्स आहेत असे काहींनी सांगितले. या आखणीमध्ये गोलमाल असल्यानेच ही उर्वरित आखणी तशीच ठेवण्यात आली आहे.
या हुकूमशाहीला जोरदार विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. हा रिंगरोड रद्द करावा अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली. याबाबत लवकरच दुरुस्त याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.
याबाबत प्रयागधाम, बिवरी, गावडेवाडी, वाडेबोल्हाई, शेतकर्यांची बिवरी (गोते) व कोरेगावमुळ इनामदार वस्ती येथे बैठक झाली. ही बैठक सोशल डिस्टन्स पाळून पार पाडली. यावेळी बाळासाहेब चोरघे, प्रभाकर कामठे, अशोक सावंत, अमित चौधरी, विठ्ठल कोलते, योगेश गायकवाड, दादा कोलते, महेंद्र झेंडे, काळुराम गोते आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous article*शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी आणि किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
Next articleपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी