जैदवाडी येथे पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची मोजणी सुरळीतपणे पूर्ण

राजगुरूनगर :पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची मोजणी जैदवाडी (ता. खेड) येथे सुरळीतपणे पूर्ण झाली. या प्रकल्पाकरिता जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी गुरुवारी (दि. २७) बैठक झाली झाली होती. त्या बैठकीस खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केल्यानंतर ग्रामस्थांनी मोजणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार बुधवारी (दि. २) मोजणीस सुरवात केली.

यावेळी ग्रामस्थांनी पुनश्च एकदा काही प्रश्न उपस्थित केले. माजी सरपंच विकास जैद यांनी प्रकल्पग्रस्तांना रेल्वेत नोकरी देणे, पाण्याचे स्रोत अबाधित राखणे, पीकपहाणी सर्वेक्षण करणे, भूसंपादनास जास्तीत जास्त दर देणे आदी मागण्या केल्या. महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे आणि महारेलचे उपमहाव्यवस्थापक एस. आर. शिरोळे व भूसंपादन अधिकारी मंदार विचारे यांनी सर्व शंकांचे निरसन केले. याप्रसंगी मंडलाधिकारी सविता घुमटकर, तलाठी मनिषा राऊत, सरपंच शितल जैद, पोलीस पाटील संगिता जैद यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, जैदवाडीतील मोजणी पूर्ण झाल्याने रेल्वे भूसंपादन प्रक्रियेस गती आली आहे. आता शासन जमिनीचा दर किती जाहीर करणार याबाबत परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Previous articleदिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि दिव्यांग संस्था यांच्या वतीने कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Next articleखोरवडी येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी