‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम पेठ ग्रामपंचायतने यशस्वी राबवली

अमोल भोसले,उरुळी कांचन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील सुरू असलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम पेठ (ता. हवेली) येथे सोमवारी (ता. २४) राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती सरपंच सुरज चौधरी यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेमुळे कोरोना रुग्णांचे निदान लवकरच होण्यास मदत होत आहे. कोरोना रुग्णांचे लवकर निदान झाले तर आपोआपच त्याचा प्रसार टाळता येईल.

मागील दोन महिन्यांपासून पेठ गावात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चालली होती. ती रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या होत्या. त्याअनुषंगाने गावातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यासाठी सोरतापवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख भरत इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गायकवाड आणि त्यांच्या १५ सहकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती.

सदर टीमने गावातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजले. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती शासनाने दिलेल्या ॲपवर नोंदणी करून घेतली आहे. तसेच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय, याचीही माहिती घेतली आहे. तसेच याव्यतिरिक्त कोणास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत का? याचीही माहिती संकलित केली आहे.

यावेळी माजी सरपंच बापुसाहेब चौधरी, उपसरपंच वर्षाराणी चौधरी, ग्रामसेविका उज्वला हिंगणे, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी,ग्रामपंचायत सदस्य तानाजी चौधरी,रघुनाथ चौधरी, काळुराम चौधरी, जयश्री चौधरी, शोभा चौधरी, तुळशीराम चौधरी, तानाजी चौधरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleमहागांव मध्ये भगवान सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य किटचे वाटप
Next articleमोहीनी राक्षे यांची क्राईम बाॅर्डर वृत्तपत्राच्या खेड तालुका प्रतिनिधी पदी नुकतीच नियुक्ती