अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, स्कॉर्पीओ आणि पिकअपसह विविध गाड्यांची चोरी करणार्‍या चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या पोलिसांनी अटक

अमोल भोसले

अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, स्कॉर्पीओ आणि पिकअपसह विविध गाड्यांची चोरी करणार्‍या चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून  १० ट्रॅक्टर सह ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 सतीश अशोक राक्षे ( रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, ता. शिरूर ), ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे  (रा. रम्यनगरी कॉलनी, धनु झेंडे यांचे बिल्डींगमध्ये, ता. शिरूर, मुळ रा. जयनगर, ता. औसा, जि. लातूर), प्रविण कैलास कोरडे (मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, ता. शिरूर) आणि सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते (रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर, पारनेर आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर सारखेच चोरी जात होते. सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनय देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या.
 त्यानुसार, आरोपींना पकडण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहीते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, दत्तात्रय तांब, दिपक साबळे, राजू मोमीण, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे, संदिप वारे, जितेंद्र मांडगे आणि  अक्षय जावळे यांचे पथक तयार करण्यात आले होते.
शिरुर शहरात राहणारे इसम नामे सतीश अशोक राधे, ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे व प्रविण कैलास कोरडे हे तिघेही एकत्रित फिरतात. आणि ते कोणत्याही प्रकारचा कामधंदा करीत नसून त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर, पिकअप आणि विविध गाडया आहेत. अशी माहीती सदर पथकाला एका खबर्‍यामार्फत माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने सदर पथकाने इसम नामे सतीश अशोक राक्षे याच्या शिरूर येथील राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता,  राक्षे आणि त्याचे तीन  साथीदार ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे, प्रविण कैलास कोरडे, आणि सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते यांनी मिळून २८ ठिकाणी चोर्‍या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून १० ट्रॅक्टर, २ पिकअप, १ बोलेरो जिप, १ स्कॉर्पीओ, ६ मोटार सायकल, ऑक्सीजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, ५ गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने असा एकूण ७६ लाख ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे जिल्हातील शिरूर, आळेफाटा, नारायणगाव, खेड, यवत आणि मंचर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२ गुन्हे ,अहमदनगर जिल्हातील बेलवंडी आणी पारनेर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ८ गुन्हे सोलापूर  जिल्हातील बार्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हा उघडकीस आला आहे.
 मुद्देमाल जप्त
 ट्रॅक्टर १०, बोलेरो पिक अप जीप २, बोलेरा जीप १, स्कॉर्पिओ जीप १,  मोटार सायकल ६, जनावरे गायी ६ आणि बँक / पतसंस्था/ ए.टी.एम. फोडण्याचा ३ वेळेस प्रयत्न करताना वापरण्यात आलेले साहित्य
Previous articleदौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Next articleशेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरणारी सराईत टोळी जेरबंद