कुरकुंडी येथील वृध्द महिलेची हत्या करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला चाकण पोलीसांनी बेड्या ठोकल्या

चाकण : शरीर संबंधास विरोध केल्याने एक्काहत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा डोक्यात व तोंडावर लोखंडी फुकणीने प्राणघातक हल्ला करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२४ ) उघडकीस आला. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कुरकुंडी येथे ही घटना घडली असून, खुनानंतर वासनांध झालेल्या माथेफिरू लिंगपिसाट नराधमाने एक्कात्तर वर्षीच्या वृद्धेला आपली शिकार बनवत तिच्यावर पाशवी अत्याचार केला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या विचित्र घटनेने खेड तालुका सुन्न झाला असून, सुतावरून स्वर्ग गाठत पोलिसांनी गावातीलच नराधम दिवट्याला मंगळवारी आज ( दि.२५ मे ) रोजी बेड्या ठोकल्या आहेत.

अनिल सुदाम वाघमारे ( वय – ५२ वर्षे, रा. कुरकुंडी, ता. खेड,) असे खून करून अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे.

वृध्द महिलेच्या सूनने दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी वाघमारे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिलेल्या माहिती नुसार, खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कुरकुंडी या गावात एकात्तर वर्षीय महिला स्वताच्या घरात एकट्याच राहत होत्या. कुरकुंडी येथून सोमवारी चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास पंचमुख यांना फोनद्वारे वरील घटनेची माहिती मिळाली. येथे राहणारी वयोवृद्ध महिला त्यांच्या राहत्या घरात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आहेत.महिलेचा खून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, गुन्हे पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विजय जगदाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केली असता सुरुवातीला सदरचा खून कोणी, कशाने व का केला असावा, याबाबत पोलिसांना काही समजून येत नव्हते. सदर घटनास्थळावर पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे आदींनी हजर राहून आपल्या सहकाऱ्यांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदींच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाची अत्यंत बारकाईने पाहणी करून तपास केला.

दरम्यान, गुन्हा घडला त्याठिकाणी श्वानपथकास व फिंगर प्रिंटर यांना पाचारण करण्यात आले. यामध्ये पुणे येथील श्वानपथकातील ज्याक या श्वानाने चांगली कामगिरी केली. त्यानंतर तातडीने पोलिसांची पथके तयार करुन संपूर्ण कुरकुंडी गाव पिंजून काढण्यात आले. बारीक सारीक गोष्टींचा व तांत्रिक बाबीचा आधार घेण्यात आला. अवघ्या काही तासातच सदर गुन्ह्याची उकल होवून खुनाला वाचा फुटली. नराधम अनिल सुदाम वाघमारे याने वृध्द महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले. वाघमारे याला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. अनिल याने सोमवारी महिलेच्या घरी व घरालगत कोणी नसल्याचा मोका साधून आई समान असलेल्या वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने वाघमारे यास प्रतिकार केला. त्यामुळे वासनेने पछाडलेल्या वाघमारे याने घ्ररातील लोखंडी फुकनीने महिलेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार मारले.महिलेचा मृत्यू झाल्याची खात्री होताच वाघमारे याने तिला आपली शिकार बनवत पाशवी अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अनिल वाघमारे याच्यावर फिर्यादी वरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, विकास पंचमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका साळुंके, पोलीस हवालदार सुरेश इंगळे, दीपक हांडे, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, दत्ता बिराजदार, शशिकांत होले, निखिल वरपे, प्रदीप राळे, नितीन गुंजाळ, अशोक दिवटे, सुप्रिया धुमाळ आदींनी केली आहे.

Previous articleघरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Next articleदौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश