मोशी ते चांडोली रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार – खा. डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव (किरण वाजगे)

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण (बायपास) रस्त्यावरील उर्वरित व सुरक्षाविषयक कामे महिनाभरात पूर्ण करा. तसेच मोशी ते चांडोली रस्त्याच्या सहापदरीकरण कामाची सुरूवात चाकण चौकातील पुलाच्या कामाने करण्याचे नियोजन करा, अशा सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समवेत आयोजित केलेल्या बैठकीत आज दिल्या.नारायणगाव व खेड घाट बायपास रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. तरीही अद्याप सुरक्षा विषयक आणि विद्युतीकरणाची कामे बाकी आहेत. ही कामे अर्धवट असताना रस्ता वाहतुकीसाठी खुला केला तर अपघातांची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बायपास रस्त्यांची पाहणी करणार आहोत. त्यावेळी कामांचा आढावा घेऊन दोन्ही बायपास रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याबाबत निर्णय घेता येईल, असे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, विभागप्रमुख दिलीप शिंदे, थोरात, गरड आदी अधिकारी उपस्थित होते.
मोशी ते चांडोली रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याची सुरुवात चाकण चौकातील पुलाच्या कामाने करावी ही महत्त्वाची सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे प्रकल्प संचालक चिटणीस यांनी मान्य केले.

खोडद चौकातील पुलाच्या कामाचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्याचा प्रस्ताव तसेच जैदवाडी जंक्शन सपाटीला एसएनजी महाविद्यालयासमोर स्थलांतरीत करण्याचाही प्रस्ताव पाठविल्याची माहिती प्रकल्प संचालक चिटणीस यांनी या बैठकीत दिली. अपघाताची ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही खासदार डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर जुन्नर हा पर्यटन तालुका घोषित झाला आहे. त्यामुळे नारायणगाव प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व तालुक्यातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवणारी चांगली कलाकृती निर्माण करण्याची सूचना देखील खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. त्यासाठी आवश्यकता भासल्यास आपण स्वयंसेवी संस्था, सीएसआर आदी मदत करण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव लवकरच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्याचे आश्वासन प्रकल्प संचालक चिटणीस यांनी दिले.
आगामी दोन वर्षांत मोशी ते चांडोली रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी माझे प्रयत्न असून मी प्रत्येक स्तरावर या कामावर लक्ष ठेवणार आहे. ६-७ वर्ष ठप्प झालेले बायपास रस्त्यांचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन मी जनतेला दिले होते. त्यानुसार नारायणगाव व खेड घाट बायपास रस्ते अंतिम टप्प्यात आहेत, तर उर्वरीत कळंब, मंचर, राजगुरुनगर आणि आळेफाटा येथील कामे सुरू झाली आहेत. तर मोशी ते चांडोली रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदार निश्चित झाला आहे. येत्या काही दिवसांत हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यात आपण यशस्वी होत असल्याचे समाधान खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.

पुणे नाशिक रेल्वे बायपासच्या पूर्व बाजूने जाणार हे माहित असताना म्हणजेच ज्यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणात खोडद रस्त्याने वाढण्याची शक्यता असताना तथाकथित पाठपुरावा करणारांनी खोडद येथे अंडरपासची मागणी का केली नाही हा संशोधनाचा विषय आहे. माजी खासदारांना व्हिजन नव्हते का? रेल्वे होईल या गोष्टीचा विश्वास नव्हता का..? की आपल्या बगलबच्च्यांच्या जमिनीला सोन्याचा भाव मिळेल याची तजवीज करायची होती ? अशी टिका यावेळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग मार्गी लागला असून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचे भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. भूसंपादनाचे काम लवकर मार्गी लावून प्रत्यक्ष रेल्वेलाईनचे काम सुरू करण्यावर आता आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleभोरगिरी येथे चक्रिवादळाने नुकसान झालेल्या कुटूंबांना हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनकडून मदत
Next articleलॉकडाऊन काळात जुगार खेळणाऱ्याची दौंड पोलिसांकडून धुलाई