निधीची तरतूद होऊनही खाजगी शाळा अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेतच

मुंबई- मनपा अंतर्गत येणाऱ्या अनुदानास पात्र १०४ खाजगी प्राथमिक शाळा गेली दहा ते पंधरा वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमानुसार या खाजगी अनुदान पात्र शाळांना पन्नास टक्के अनुदान राज्य सरकार व पन्नास टक्के अनुदान मुंबई मनपा यांच्याकडून मिळणे अपेक्षित होते मात्र असे कोणतेही अनुदान अद्याप मिळालेले नाही. महानगरपालिका शिक्षण विभागाचे सहआयुक्त रमेश पवार यांनी खाजगी शाळांच्या अनुदानासाठी ३८० कोटी २०२१ – २२ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली असून त्यापैकी १०४ शाळांकरिता ३०८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दाेशी यांनी १७ फेब्रुवारी २०२१ रोजी दिली. परंतु अद्याप याबाबत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. अनुदानाअभावी कर्मचारी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. त्यातच कोरोनाकाळ असल्यामुळे आर्थिक परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे.

यामध्ये बहुतांशी प्राथमिक शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. मुंबई महानगर पालिकेने वेतन अनुदान सुरू न केल्यास त्याचा विपरीत परिणाम संबधित खाजगी शिक्षण संस्थांवर होणार आहे. मुंबईतील मराठी माणसाच्या शैक्षणिक हितासाठी मराठी माणसांकडून सुरु असलेल्या मराठी शैक्षणिक संस्थांचा पाया भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री , महापौर व महापालिका आयुक्त यांना पत्र लिहून मुंबई मनपा अंतर्गत येणाऱ्या पात्र खाजगी प्राथमिक शाळांना किमान मुंबई मनपाने आपला अनुदान हिस्सा तातडीने देऊन अनुदान सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी केली.

Previous articleशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खतांची वाढलेली दरवाढ तात्काळ रद्द करावी- खा.डॉ. अमोल कोल्हे
Next articleदिवे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात बहरणारं ‘देवराई’