कोरोना नंतरचे पर्यटन आणि उपाययोजना” या विषयावर दिपक हरणे यांचे मार्गदर्शन

पुणे- 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन संचालनालय आणि अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही कृषी आणि पर्यटन विषयातील तज्ञ, अभ्यासू मान्यवरांचे अनुभव आणि मार्गदर्शन यासाठी परिसंवाद आयेजित करण्यात आला. दि. 13 मे 2021 रोजी या परिसंवादामध्ये “कोरोना नंतरचे पर्यटन आणि उपाययोजना” या विषयावर एमटीडीसी चे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी कृषी पर्यटन क्षेत्रातील कृषी पर्यटन केंद्र संचालक, पर्यटन व्यावसायिक आणि कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांचेसह उत्साहाने सहभाग घेतला. परिसंवादादरम्यान संबंधितांनी आपआपले अनुभव सांगताना पर्यटन क्षेत्रास उभारी आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला.

यावेळी दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे म्हणाले कि, “संपूर्ण जगात आज रोजी कोरोनाव्हायरस या महामारी चे मोठे संकट आलेले आहे. उभ्या जगाशी गनिमी कावा खेळणाऱ्या हा दुष्ट विषाणु मुळे आपला भारत देश पण प्रभावित झालेला आहे. या संकटाचा सामना करत असताना आपल्या सरकारने घेतलेला संचारबंदीचा निर्णय हा कोरोनाव्हायरस च्या वेगाने वाढणाऱ्या प्रसाराला थांबवण्यासाठी अतिशय गरजेचा आहे. आताची साधारणतः परिस्थिती, इतर देशांची उदाहरणे व आपल्या सरकारचे प्रयत्न बघता ही परिस्थिति जुन – 2021 पर्यन्त सुधारणे अपेक्षित आहे. त्यानंतरही सरकारकडे पर्यटन या क्षेत्राशिवाय अन्न , आरोग्य, रोजगार, ई . प्राधान्याचे विषय असणार आहे. या संकटामुळे पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन या महामारी नंतरच्या काळात पर्यटकांसाठी दीर्घकालीन उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

“सध्याच्या वातावरणामुळे सर्वाधिक परिणाम हा पर्यटन उद्योगावर झाला आहे. संचारबंदी मुळे सर्वच बाबतीत मर्यादा आल्या आहेत. तथापि, या काळामध्येही सर्वानी स्वच्छता हीच सेवा आणि अतिथी देवो भव ही ब्रीद वाक्य उराशी बाळगुन संचारबंदी असली तरिही पर्यटन केंद्रावर आणि पर्यटक निवासामध्ये साफसफाई, दुरुस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे योग्य ती खबरदारी घेवुन सुरु करण्यात यावी. पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना आणि पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात यशस्वी होणे गरजेचे आहे.”
“वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतुक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासुन दुर निसर्गरम्य ठिकाणी जावुन रहावे आणि सोबत कामही करावे असे वाटणे साहजिक आहे.”

“आगामी काळात पर्यटकांना वेगवेगळया प्रकारे आकर्षित करुन पर्यटन व्यवसायास भरभराटी येणार आहे. मात्र सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात यावे. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी कायमस्वरुपी करण्यात येवुन पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात यावी. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात यावे. शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात यावी. कर्मचाऱ्यांसाठी मुखपटटी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करणे आणि कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करणे आवश्यक आहे. उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा कोरोनानंतर पुरविण्यात याव्यात. ”

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यातील सर्वच पर्यटक निवासांमध्ये साफसफाई आणि निर्जंतुकिरणाची कामे यापुर्वीच सुरु केली असुन विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखादया पर्यटकाला त्याने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येईल. “वर्क फ्रॉम नेचर” योगा आणि मेडीटेशन अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे सुरु करण्यात येणार आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा होईल. पर्यटकांना कोरोना संचारबंदीनंतर महामंडळाच्या पर्यटक निवासात पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोना बाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसुन येईल. निसर्गाचे भान ठेवुन आणि कोरोना बाबत दक्षता घेवुन आगामी संचारबंदीनंतरच्या काळात बिनधास्त पर्यटन करता येणार आहे.”

याप्रसंगी पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक आणि केंद्रचालक यांनी विचारलेल्या विविध शंका आणि प्रश्नांची उत्तरे श्री दिपक हरणे यांनी दिली. समारोपप्रसंगी श्री. गणेश चप्पलवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Previous articleदिपक सोनवणे यांची दक्षता समितीवर निवड
Next articleमहाळूंगेत २६ वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार ; उपचारा दरम्यान तरूणाचा मृत्यू