आमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतील ‘डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर’ व ‘कोव्हीड केअर सेंटरचे ऑनलाइन उदघाटन

सचिन आव्हाड

दौंड चे आमदार राहुल कुल यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या ‘डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर’ द्वारे १०० ऑक्सिजन बेड्स तसेच ‘कोव्हीड केअर सेंटर’ द्वारे विलगीकरणासाठी सुमारे २०० बेड्स च्या सुविधेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत ची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे .

कोवीड सेंटरसाठी लागणारी आवश्यक ती सर्व मदत : उपमुख्यमंत्री अजित पवार

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, आमदार राहुल कुल यांनी स्तुत्य उपक्रम सुरु केला असून, दौंड तालुका व परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा दृष्टीने हे डेडीकेटेड कोविड केअर सेंटर फायद्याचे ठरणार आहे, ऑक्सिजन पुरवठा तसेच रेमिडीसीवीर यासाठी आमदार राहुल कुल हे सातत्याने माझ्या संपर्कात असून, या कोवीड सेंटरसाठी लागणारी आवश्यक ती सर्व मदत राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. असे आश्वसन त्यांनी यावेळी दिले. ज्यांनी या सेंटरच्या कामात हातभार लावला त्यासर्वांचे उपमुख्यमंत्री अजित पवार आभार यांनी मानले तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले असून त्यासाठी आवश्यक उपयोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आमदार राहुल कुल हे अत्यंत हुशार, संयमी नेतृत्व असून त्यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जान आहे, काम कसे करून घ्यायचे ते त्यांना चांगले जमते, राज्यातील पहिलाच हायब्रीड डेडीकेटेड कोविड केअर सेंटर व विलगीकरण उपक्रम त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून सुरु केला असून असा उपक्रम राबविणारे ते राज्यातील पहिलेच आमदार असावेत असे गौरौद्गार माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केले आहेत. लवकर चाचण्या आणि उपचार केल्या तर पुढील १५ दिवसांतच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना या कोविड सेंटरचा फायदा होणार असून, तुम्ही व तुमच्या दानशूर सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाची सुरवात होणे आवश्यक आहे. कोविड सेंटरला शुभेच्छा काय द्यायच्या हा मोठा प्रश्न असून याठिकाणी रुग्णांना चांगली सेवा मिळून रुग्ण चांगल्या प्रकारे बरे होऊन घरी जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

यावेळी बोलताना आमदार राहुल कुल यांनी सांगितले की , दिपगृह, देऊळगावगाडा येथील ‘डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर’ व ‘कोव्हीड केअर सेंटर’ मध्ये १०० ऑक्सिजन बेड व २०० विलगीकरण बेड तयार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सुसज्ज हॉस्पिटलच्या धर्तीवर चोवीस तास वैद्यकीय सुविधा, वॉर्ड बॉय, नर्सेस, ऑक्सिजन लाईन्स, फोल्डेबल बेड्स, महिला व पुरुषांसाठी विभक्त विलगीकरण कक्ष, प्रत्येक बेड्स साठी आवश्यक टेबल्स, वैद्यकीय उपकरणे, इतर साधने, घोषणा प्रणाली, प्रोजेक्ट्रर्स, ऍम्ब्युलन्स, जनरेटर, सिक्युरिटी, औषधांसाठी स्वतंत्र कक्ष, इन हाऊस क्लीनिंग टीम, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वछतागृहे आदी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत व या ठिकाणी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णाचे संपूर्ण उपचार, औषधे, जेवण आदी सर्व सुवीधा मोफत देण्यात येणार आहेत.

आमदार विकास निधीचा वापर करून उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत ‘डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर’ व ‘कोव्हीड केअर सेंटर’ चा विस्तार करण्याचा हा विशेष उपक्रम राबविल्या बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांचे अभिनंदन करून सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.

Previous articleदेऊळगाव राजे येथे कोविड केअर सेंटरचे उदघाटन
Next articleचिंचवड देवस्थानची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत