नारायणगाव बाह्यवळण रस्ता येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी सुरू होणार – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

नारायणगाव (किरण वाजगे)
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्ता येत्या महिन्याभरात सुरू होणार असल्याचे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे केले. नारायणगाव येथे या बाह्यवळण रस्त्याची पाहणी करत असताना पत्रकारांशी श्री आढळराव यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, माजी उपसरपंच संतोष दांगट, रोड वे सोल्युशन कंपनीचे व्यवस्थापक संतोष घोलप, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, माजी सरपंच रामदास बाळसराफ, आरिफ आतार, संतोष पाटे, गणेश पाटे, राजेश बाप्ते, दिलीप वाजगे, अभय वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री आढळराव म्हणाले की, याठिकाणी बायपासच्या मोठ्या पुलावरील विद्युत खांब बसविण्याचे काम बाकी असून सद्यस्थितीत रस्ता सुरू केल्यास विद्युत खांब बसविण्याच्या कामासाठी पुन्हा रस्ता बंद करावा लागेल ही अडचण ठेकेदाराने मांडली. त्यामुळे सर्व शिल्लक लहान-मोठी कामे तात्काळ पूर्ण करून महिनाभरात रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना रोड वे सोल्युशन या ठेकेदार कंपनीला दिल्या. आळेफाट्याच्या दिशेला बाह्यवळण मार्ग संपतो तिथे अपघातांची शक्यता लक्षात घेऊन कामामध्ये काही दुरुस्त्या सुचविल्या. याशिवाय बायपासला लागून असलेल्या खोडद-हिवरे तर्फे नारायणगाव हद्दीमध्ये उड्डाणपूल व्हावा यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
खेड-सिन्नर महामार्गावरील १३८ किमी लांबीच्या १३४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पापैकी १०९ किमी बाह्यवळण चौपदरीकरण पहिल्या टप्यात पूर्ण करण्यात आले. मात्र बाह्यवळण मार्गाच्या कामामध्ये अडथळा आल्यानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करत सर्व अडचणींवर यशस्वीपणे मात करुन रस्त्यावरील बाह्यवळण मार्गाची स्वतंत्र निविदा काढण्यास सरकारला भाग पाडले. ऑक्टोबर २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिलेल्या बाह्यवळण कामांपैकी नारायणगाव बायपास व खेड घाट या कामांची फेब्रुवारी २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ८ मार्च २०१९ रोजी म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्याच्या २ दिवस आधी रोड वे सोल्युशन या कंपनीला ७२ कोटींना हे काम निश्चित होऊन कामाचे इरादा पत्र देण्यात आले. त्यानंतर लोकसभेची आचार संहिता जाहीर झाल्याने जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली.

त्यामुळेच आता या ९.५० किमी लांबीच्या नारायणगाव बाह्यवळणाचे व खेड घाटाचे काम आता पूर्ण होताना दिसत आहे. निविदा उघडण्यासाठी आय.एल.एफ.एस. कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागामधील कायदेशीर वादामुळे काम करण्यास अडचणी येत होत्या. माझ्या आग्रहावरून स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करुन कपंनीकडून या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतले. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे चेअरमन व सचिव यांच्याकडून खास बाब म्ह्णून परवागनी मंजुर करुन आणली. त्यामुळे या कामाची निविदा उघडण्यात येऊन रोड वे सोल्युशन या कंपनीला ७२ कोटी ८८ लक्ष रुपयांना निविदा मंजुर करण्यात आली होती.
खेड घाट व नारायणगाव येथून प्रवास करताना नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो हे लक्षात घेऊनच मी खासदार असताना दोन्ही बायपास कामाचे स्वतंत्र टेंडर काढून काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी लोकसभेत आवाज उठविला होता. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चेअरमन, सचिव यांच्यासह नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही सातत्याने मागणी लावून धरली होती. त्यामुळे हे बायपास लवकर सुरू होऊन रस्ता वाहतुकीला उपलब्ध होत असताना मला अतिशय आनंद होत असून लोकांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे. असे माजी खासदार आढळराव म्हणाले.


यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार शरद सोनवणे तसेच तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय तसेच वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे पवित्र रमजान महिन्यांमध्ये व येणाऱ्या ईद निमित्त मुस्लिम बांधवांना फळे वाटप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या

Previous articleअवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई
Next articleदेऊळगाव राजे येथे कोविड केअर सेंटरचे उदघाटन